रथोत्सवातील गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या चेन लंपास

रथोत्सवातील गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या चेन लंपास
Published on: 
पारोळा रथोत्सवातील चोरीप्रकरणी एकास अटक बीडमधून ताब्यात; ४७ ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : पारोळा येथील रथोत्सवात झालेल्या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून चोरणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून अटक केली. गणेश कचरू पवार (वय ४०, रा. अयोध्यानगर, बहिरवाडी, बीड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ४७ ग्रॅम वजनाच्या तीन सोनसाखळी हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत सहा लाख ११ हजार रुपये आहे. पारोळा शहरात २२ ऑक्टोबरला रथोत्सवानिमित्त गर्दी जमली असताना, तीन ते चार अज्ञात इसमांनी गर्दीचा फायदा घेत फिर्यादी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून तोडले आणि तेथून पोबारा केला होता. याप्रकरणी २५ ऑक्टोबरला पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्वतंत्र पथक नियुक्त केले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील संशयित बीड शहरातील असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याचे नाव गणेश पवार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथक बीड येथे रवाना झाले. तीन सोनसाखळ्या हस्तगत जप्त केलेल्या मुद्देमालात १३ ग्रॅम वजनाची पाटली असलेली सोनसाखळी (किंमत एक लाख ६९ हजार रुपये), १७ ग्रॅम वजनाची फॅन्सी सोनसाखळी (दोन लाख २१ हजार रुपये) आणि १७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ (दोन लाख २१ हजार रुपये) यांचा समावेश आहे. अशा एकूण ४७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची किंमत सहा लाख ११ हजार रुपये आहे. पारोळा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी हितेश चिंचोरे तपास करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाती पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलिस कर्मचारी हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाने, राहुल कोळी, विलास गायकवाड, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील आणि चालक रिजवान शेख यांनी केली. चौकट आठ दिवसांची शोध मोहीम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड शहरात सलग आठ दिवस ठाण मांडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर गणेश पवार याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर दोन पंच आणि सोनार यांच्या उपस्थितीत त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.