मनमाड रेल्वे स्थानकातून धावू लागली पॅसेंजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनमाड रेल्वे स्थानकातून धावू लागली पॅसेंजर

नाशिक : मनमाड रेल्वे स्थानकातून धावू लागली पॅसेंजर

sakal_logo
By
अमोल खरे

मनमाड, (जि.नाशिक) : कोरोनाकाळात बंद करण्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून अनारक्षित तिकिटासह एकमेव दौंड - मनमाड - निजामाबाद पॅसेंजर धावू लागली आहे. परंतु, नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली गोदावरी एक्स्प्रेससह इतर पॅसेंजर व जलद रेल्वे प्रवाशी गाड्या कधी धावणार याची प्रतिक्षा मनमाडकरांना कायम आहेत.

कोरोना संसर्ग सुरू झाला. त्यानंतर कडक लॉकडाउन लावण्यात आले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाकाळात विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. या गाड्यांना जनरल तिकीट दिले जात नव्हते. तर आरक्षण करून जावे लावत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. याबाबत अनेकदा विविध पक्ष, संघटनांकडून रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, सध्या कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने मनमाडहुन धावणारी पहिली पॅसेंजर प्रवाशी गाडी सुरू केली आहे.

हेही वाचा: अहमदनगर : श्रीपाद छिंदमच्या प्रभागात पोटनिवडणूक

मनमाड जंक्शन स्थानकातून गाडी क्रमांक ०१४०९ दौंड - निजामाबाद - आणि गाडी क्रमांक ०१४१० निजामाबाद - मनमाड - दौंड या पॅसेंजर गाडीचा प्रवास अखेर सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर पॅसेंजर गाडी धावू लागली. या गाडीचे अनारक्षित जनरल तिकिट रेल्वे स्थानकातील तिकिट बुकींग खिडकीतून मिळू लागले आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद

गाडी येण्याच्या एक तास अगोदर प्रवाशांना जनरल तिकिट दिले जाते. मात्र, तिकिट घेण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तसेच, आधार किंवा पॅनकार्ड दाखवावे लागणार असल्याची सूचना तिकिट बुकिंग खिडकीवर लावण्यात आली आहे. या एकमेव पॅसेंजर गाडीला सध्या प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला आहे.

इतर गाड्यांची प्रतीक्षा कायम

मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन मनमाड - कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस, भुसावळ मुंबई पॅसेंजर, मनमाड - इगतपुरी शटल, मनमाड - पुणे पॅसेंजर या प्रवाशी गाड्या कधी सुरू होणार याची प्रतिक्षा प्रवाशांना लागून राहिली आहे.

"सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्यांसह गोदावरी एक्स्प्रेस तातडीने सुरू करावी, प्रवाशांना अनारक्षित तिकिटे मिळावे, मासिक पास द्यावा."

- नरेंद्र खैरे, अध्यक्ष, प्रवाशी संघटना

loading image
go to top