पितळखोऱ्यातील पाटणादेवी.. आध्यात्म अन्‌ पर्यटनाचा संगम

पितळखोऱ्यातील पाटणादेवी.. आध्यात्म अन्‌ पर्यटनाचा संगम
Published on: 
धार्मिक पर्यटन ---- NSK26H32047 चाळीसगाव : तालुक्यातील पितळखोऱ्याच्या रम्य परिसरात स्थित पाटणादेवीचे मंदिर. ---- NSK26H32048 चाळीसगाव : वन विभागाने विकसित केलेल्या निसर्गवाचन केंद्र परिसरातील भास्कराचार्यांचा पुतळा. ----- NSK26H32049 चाळीसगाव : पाटणादेवी मंदिरालगत या परिसराचे निसर्ग सौंदर्य वाढविणारा धबधबा.. ----------- NSK26H32050 (राजेश ठोंबरे) ---------- अध्यात्म अन्‌ पर्यटनाचा संगम ------------------------ पितळखोऱ्यातील पाटणादेवी चाळीसगावजवळील गौताळा अभयारण्य म्हणजे जैवविविधतेचा समृद्ध खजिना, पितळखोरा लेणी म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पकलेचा अमूल्य वारसा, तर श्रीक्षेत्र पाटणादेवी म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि ज्ञानपरंपरेचे केंद्र. भास्कराचार्यांच्या जन्मभूमीचा गौरव लाभलेल्या या परिसरात निसर्गभ्रमंती, गिर्यारोहण, ऐतिहासिक वारसा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. - राजेश ठोंबरे, चाळीसगाव पूर्वीच्या काळी लोक ठराविक काळात जाणून-बुजून पर्यटनासाठी बाहेर पडत. सध्याच्या काळात मात्र पर्यटनाला जागतिक स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्यामुळे आता कोणता काळ कोणत्या भागातील पर्यटनासाठी सुयोग्य आहे. तेथे काय काय सुविधा उपलब्ध आहे. प्रमुख रस्ते, लोहमार्ग किंवा विमान सेवा किती जवळ आहेत. त्या भागातील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्वच स्तरावरून नेमकेपणे माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होत असते. त्यामुळे पर्यटन आता बऱ्यापैकी सोयीचे झाले आहे. चाळीसगावतील गौताळा अभयारण्य हे जंगल सफारीसह जैवविविधता, तेथील पितळखोरा हे गिर्यारोहणासाठी आणि याच क्षेत्रातील श्रीक्षेत्र पाटणादेवी येथील मंदिर हे अध्यात्माचे केंद्र आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हा तिहेरी संगम याठिकाणी आढळून येतो.. चाळीसगाव शहरापासून कन्नड घाटमार्गे वर चढून कालीमठ येथून सरळ पुढे गेले तर शेवटचे टोक म्हणजे पितळखोरे लेणी आहेत. साधारणपणे हे अंतर ३५ किलोमीटर इतके येते. या लेण्यांच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पाटणादेवी येथून देखील देवी मंदिराच्या पाठीमागून डोंगर चढून वर पोहोचता येते. पितळखोरा लेणी या भारतातील सर्वात प्राचीन लेणी असून त्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. येथील लेणी डोंगराच्या कपारीत दरीच्या दोन्ही काठांवरील दगड फोडून तयार केलेल्या आहेत. डोंगरातून वाहणाऱ्या डोंगरी नदीच्या प्रपातामुळे या लेण्यांचे दोन भागात विभागणी झाली आहे. एका भागात एक ते नऊ व दुसऱ्या भागात दहा ते बारा लेणी आहेत राजा सातवाहनांची राजधानी पैठण ते नालासोपारा हा अति प्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोरा इथूनच जात होता. त्यामुळेच लेणी करण्यासाठी या जागेची निवड अगदी बरोबर होती. महामायुरी या बौद्ध ग्रंथांमध्ये शकरीन हा यक्ष पितलिंगया येथे राहतो असा उल्लेख आलेला आहे. या ग्रंथाच्या संदर्भातून या म्हणजे आताचे पितळखोरे असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. पुरातत्वीय संशोधनावरून ही लेणी दुसऱ्या शतकाच्या जवळपास वापरात होती. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरू झाली. हे दोन्ही काळ सातवाहन आणि वाकाटकांचे होते. लेण्याच्या प्रवेशद्वाराला ११ पायऱ्या आहेत. उजव्या बाजूला हत्तींची रांग दिसते, या सर्व लेण्यांचा भार या हत्तींनी उचलून धरला आहे असे जाणवते. प्रवेशद्वारावरचा पट्टा अर्ध कमळ आणि त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे. दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आपल्याला उभे दिसतात. या लेण्यातील काही गुहा दोन मजली असाव्यात कारण वरच्या भागात जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या आपल्याला दिसून येतात. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे . मधल्या भागात ३५ स्तंभ असून त्यावर धवल, कृष्ण, रक्त, तपकिरी, किंवा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्याशांची चित्र आहेत. दालनातील छत सिंहासनाधिष्ठित आणि छत्रधारी बुद्ध प्रतिमा चितारून सजवलेले आहे. लेणी क्रमांक तीन आणि लेणी क्रमांक चार यांच्या दर्शनी भागात गंधिक कुलातील मीतदेव आणि पैठणचे संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. लेणी क्रमांक चार येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखवलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती विविध अलंकारांनी सजवलेले असून त्यांच्या दोन्ही बाजूंना घंटा लोंबलेल्या दिसतात. भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे वेगळे महत्त्व प्राप्त या लेण्यांना झाले आहे. पाटणादेवी चाळीसगाव शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर पाटणादेवीचे सुंदर असे मंदिर आहे. गौताळा अभयारण्यातील हे आदिशक्तीचे वरदहस्त शक्तिपीठ आहे. देश विदेशातील अनेकांची ही कुलस्वामिनी आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांसोबतच भक्तगणांचाही मोठ्या प्रमाणावर वावर आहे. पाटणादेवी या परिसरात अजूनही इतर धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा सांगणारी सुंदर अशी पर्यटन स्थळ आहेत. त्यात हेमाडपंथी महादेव मंदिर, शृंगार चावडी, नागार्जुन कोठी, जैन मुनींच्या गुंफा, उभा गणपती, सीतान्हाणी, गायमुख तसेच धवलतीर्थ आणि केदार कुंड हे पर्यटकांना आकर्षित करणारे उंचावरून कोसळणारे धबधबे आहेत. त्याचबरोबर वरच्या भागात कन्हेरगड किल्ल्याचे अवशेषही बघायला मिळतात. भास्कराचार्यांची जन्म-कर्मभूमी गणितसूर्य भास्कराचार्य यांची ही जन्म आणि कर्मभूमी आहे. भास्कराचार्य नावाचा एक महान आणि महा विद्वान गणित आणि खगोलशास्त्रज्ञ बाराव्या शतकात होऊन गेला याचा अनेकांना थांब पत्ताच नसेल याचे कारण आपल्या अभ्यासक्रमात भास्कराचार्यांना कुठेच स्थान देण्यात आलेले नाही या महान गणिततज्ज्ञ गणित सूर्य भास्कराचार्यांचा जन्म इसवी सन १११४ मध्ये पाटणादेवी या गावी झाला, तेथेच ते लहानाचे मोठे झाले. बुद्धिमान व्यक्ती निरनिराळे विषय कसे आत्मसात करू शकतात याचे भाऊ दाजी लाड हे उत्तम उदाहरण आहे त्यांनीच प्रथम पाटणादेवी येथील भास्कराचार्यासंबंधीत शिलालेख उजेडात आणला. १८६२ ते १८६६ या काळात त्यांनी पुरातत्त्व शास्त्रावर लक्ष केंद्रित केले आणि त्यानिमित्ताने सारा देश पालथा घातला . पुरातन मंदिरे, गुहांमधील रंगकाम, नाणी, ताम्रपत्रे, शिलालेख याचा प्रचंड संग्रह केला. त्याच काळात त्यांनी चाळीसगाव जवळील पाटणादेवी मंदिराला भेट दिली. त्यावेळी मंदिराचा परिसर जंगलात लुप्त झालेला होता. मंदिराच्या परिसरातच त्यांना चांगदेव या भास्कराचार्यांच्या नातवाने करून घेतलेला शिलालेख मिळाला. त्या शिलालेखाचे काळजीपूर्वक वाचन करून भाऊंनी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. पाटणादेवी येथील शिलालेखात भास्कराचार्यांचा संपूर्ण वंश वृक्ष दिला आहे. भास्कराचार्य आपल्या काळाच्या कितीतरी पुढे होते यात शंकाच नाही. सतराव्या व अठराव्या शतकात पाश्चात्त्य गणितज्ञांनी विचारार्थ घेतलेले काही गणित सिद्धांत आणि समीकरणे याचे सुलभ विश्लेषण त्याच्या आधी पाचशे वर्ष भास्कराचार्यांनी करून ठेवलेले होते. इन डिटर्मेंट इक्वेशन ऑफ फर्स्ट अँड सेकंड डिग्री, कॅल्क्युलेस, इक्वेशन ऑफ टाईम, इमॅजिनरी नंबर्स वगैरे गोष्टी त्यांच्या सखोल बुद्धिमत्तेची साक्ष देतात. ही समीकरणे सोडवण्याच्या भास्कराचार्यांच्या पद्धती अतिशय सोप्या आहेत हे विशेष. आमच्याकडे असा गणकचक्रचुडामणी जन्माला यावा हे आमचे भाग्य आहे. अशी आहे जैवविविधता या अभयारण्यामध्ये समृद्ध असे जीवसृष्टी देखील बघायला मिळते. ८५०च्या वर वनौषधी आहेत, तसेच ५४ प्रकारची फुलपाखरे, ३४ प्रकारचे साप, २३२ प्रकारचे पक्षी, असंख्य कीटक, विविध प्रकारच्या पाली, सरडे, तर अगदी झाडावर राहणाऱ्या सुसुंदरी पासून ते पट्टेरी वाघ या जंगलात आहेत. पाटणादेवी हे अनेक विद्वान, शास्त्रज्ञ, अभ्यासक, विचारवंत, लेखक, विषयतज्ज्ञ या सर्वांसाठी ज्ञानाचा अथांग खजिना असणारे खुले विद्यापीठाचा आहे. --- (या ठिकाणी पर्यटकांना निवासासाठी वनविभागामार्फत डॉरमेटरी, पथिका आश्रम आणि हत्ती बंगला असे रेस्ट हाऊस आहेत. यांचे छत्रपती संभाजीनगर येथील वनविभागाच्या कार्यालयातून आरक्षित करता येते..) --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.