गांधीतीर्थ येथे ‘पीक वॉक’;
४० पालक, शिक्षकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : लोकशिक्षण मंडळ संचालित ज. सु. खडके प्राथमिक विद्यामंदिराच्या शाळा व्यवस्थापन समितीतर्फे जैन हिल्स येथील गांधीतीर्थ येथे ‘पीस वॉक’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून पालक आणि शिक्षकांना आंतरिक शांतता, आत्मिक समाधान आणि वैश्विक एकात्मतेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
या उपक्रमात गांधीतीर्थ येथील प्राध्यापक अश्विन झाला यांनी मानवी शरीराची रचना आणि पंचमहाभूतांचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून निसर्ग, मानवी जीवन आणि विश्व यांच्यातील परस्परसंबंध उलगडण्यात आले. पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे या उपक्रमात सहभागी होत शांतता व सकारात्मकतेचा अनुभव घेतला. या ‘पीस वॉक’मध्ये २५ पालक आणि १५ शिक्षक असे एकूण ४० जण सहभागी झाले होते. दैनंदिन जीवनातील धावपळीतून काही वेळ स्वतःसाठी देत मनःशांतीचा अनुभव घेणे, तसेच पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद व समन्वय वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. उपक्रमासाठी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पूनम पाटील यांनी नियोजन केले. समितीचे कार्याध्यक्ष पवन खंबायत, उपकार्याध्यक्ष जनार्दन बाविस्कर तसेच इतर सदस्यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.