फोटो : 33235
नाशिक : पोषण आहार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन त्वरित अदा करण्यासाठी शिक्षण विभागाला निवेदन देताना आयटक संलग्न संघटनेचे पदाधिकारी.
पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित
‘आयटक’ राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२१ : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करावे, शासनाने जाहीर केलेली दरमहा हजार रुपये मानधनवाढ थकबाकीसह लागू करावी आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचे संरक्षण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी ‘आयटक’ राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेला निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्य लेखापरीक्षक विनोद खैरनार आणि पोषण आहार योजना समन्वयक भारती घोटेकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित राहण्याची कारणे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भीमा पाटील, कमल भाडमुखे, ऊर्मिला तांबेरे, स्वाती आल्हाट, यमुना गाडेकर आणि मुनीर अन्सारी आदी उपस्थित होते.
प्रलंबित मानधन ८ ते १० दिवसांत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. तसेच मानधनवाढ, सेंट्रल किचन पद्धतीला विरोध, कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचे संरक्षण आणि इतर मागण्यांबाबत संबंधित विभागांना निर्देश देणारे पत्र काढण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली.