सप्तश्रृंगगड : किर्तीध्वजाच्या मिरवणूकीत खानदेशातून लोटला जनसागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

people crowd coming from Khandesh on occassion of Kirti Dhwaja at Saptashring gad Nashik News

सप्तश्रृंगगड : किर्तीध्वजाच्या मिरवणूकीत खानदेशातून लोटला जनसागर

वणी (जि. नाशिक) : दोन वर्षांपासून माहेरवासियांच्या चैत्रवारीसाठी आतुर सप्तशृंगीदेवीच्या (Saptashringi Devi temple) सप्तशिखरावर भाविकांचा महापूर आला असून रखरखत्या उन्हात घामाच्या धारा झेलत आई भगवतीच्या भेटीसाठी माहेरहून आलेले पदयात्रेकरूंसह सुमारे साडेतीन लाखांवर भक्तांनी आज दर्शन घेतले अन जीव तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली. रात्री बाराच्या सुमारास गडावर मानाचा किर्तिध्वज गवळी कुटूंबियांनी फडकविला अन सुखावलेल्या नेत्रांनी खानदेशवासियांनी गड सोडला.

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगी मातेच्या चैत्रौत्सवादरम्यान आजच्या सहाव्या माळेस सप्तशृंगीचा जयघोष, ढोल-ताशांचा निनादात अनवाणी आलेल्या लाखो पदयात्रेकरूंची पावले कुठल्याही प्रकारचा थकवा न जाणवता मोठ्या उत्साहाने सप्तशृंगगड चढून जात होती. काल सकाळपासून लागलेल्या भाविकांच्या रांगा आज रात्रीही कायम होत्या. आज मधयरात्रीपासूनच यात्रेकरुंची गर्दी उत्तरोत्तर वाढत जाऊन भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होत ट्रस्ट चौकापर्यंत बाऱ्या लागल्या होत्या.

हेही वाचा: महाज्योती आयोजित ‘तृतीय रत्न’ नाटकाला नाशिककरांचा उदंड प्रतिसाद

दरम्यान खानदेशातून आईसाहेबांच्या माहेरची भेट घेऊन आलेल्या लाखोच्या संख्येने भाविकभक्तांच्या उपस्थितीत दुपारी चारला श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपारीक पद्धतीने किर्तीध्वजाची जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश तथा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष वर्धन पी. देसाई, विश्वस्त अॅड. ललित निकम, सौ. मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, ध्वजाचे मानकरी दरेगाव येथील गवळी कुटुंबीय व पोलिस पाटील शशिकांत बेनके आदी कुटुंबियांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

हेही वाचा: एप्रिलमध्येच आटले नळ; प्रशासनाची ‘तांत्रिक’ कळ

३० ते ३५ किलो पूजेचे साहित्य गवळी पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. उप विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस उपनिरीक्षक निकम, ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, संदीप बेनके आदी उपस्थित होते.

अन खानदेशवासिय तृप्त झाले

देवस्थानच्या मुख्य कार्यालयातून किर्तीध्वजाची मिरवणूक निघून ढोल ताशाच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत काढण्यात आली. सप्तशृंगी माता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय असा जयघोष करीत सप्तशृंगगड परिसर दुमदुमून गेला होता. सायंकाळी साडेसातला देवी भगवतीच्या मंदिरात किर्तीध्वज नेण्यात येऊन गवळी पाटील कुटुंबीय आई भगवतीसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात सुमारे साडेचार हजार फूट उंचीच्या अवघड अशा शिखरावर जावून मध्यरात्री बाराच्या सुमारास शिखरावरील जुना ध्वज काढून नवीन ध्वज (निशाण) फडकला. यानंतर शेकडो मैलावरुन पदयात्रेने आलेल्या भाविकांनी शिखरावरील ध्वजाचे दर्शन घेतले तर काहींनी ध्वज फडकविण्यापूर्वीच गड सोडला.

रात्री उशिरा पहिल्या पायरीपर्यंत दर्शनासाठी बाऱ्या कायम होत्या. पदयात्रेकरूंबरोबरच खासगी वाहनांद्वारे नांदुरीपर्यंत भाविक आल्याने नांदुरी येथील ५० एकरचा परिसर वाहनांच्या पार्किगने भरुन गेला होता. नांदुरी ते सप्तशृंगी गड दरम्यान दर पाच मिनिटांच्या अंतराने बस सोडण्यात येत होत्या. नाशिक विभागातून दीडशे, नंदुरबार, धुळे, जळगाव विभागातूनही दोनशेवर बस सप्तशृंगी गडावर भाविकांच्या फेऱ्या मारत होत्या. मंदिरातही भाविकांची गर्दी लक्षात घेता एका मिनिटाला ५५ ते ६० भाविक दर्शन घेत बाहेर पडत होते. न्यासाच्या धर्मशाळेत पदयात्रेकरूच्य मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. आज सुमारे २५ हजारांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. उद्या पौर्णिमा असल्याने गडावर भाविकांची गर्दी कायम राहील.

अकरा लाख अकरा हजार अकराची देणी

नाशिक येथील देणगीदार (Donor) भाविक श्री. भरत चोप्रा यांनी श्री भगवतीच्या चरणी रक्कम रु. ११,११,१११/- श्री भगवती मंदिर जिर्णोद्धार करीता देणगी अर्पण केली. विश्वस्त संस्थे मार्फत त्यांचा श्री भगवती प्रतिमा, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.

Web Title: People Crowd Coming From Khandesh On Occassion Of Kirti Dhwaja At Saptashring Gad Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top