कळवणकर पिताहेत क्षारयुक्त पाणी

borewell water
borewell wateresakal

कळवण : पाणी जीवन आहे, असे म्हणतात. मात्र, पाणीच पिण्यायोग्य नसल्यास करावे तरी काय, असा प्रश्‍न आता कळवणकरांसमोर उभा आहे. कळवण शहराच्या विविध भागात सध्या २३ बोअरवेलच्या माध्यमातून नगरपंचायतीकडून पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यात टीडीएसचे प्रमाण भरसाठ वाढले असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी कळवणकरांनी केली आहे.

कळवणला जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. अद्याप ती अस्तित्वात आलेली नाही. सध्या गिरणा नदीच्या पाणीपुरवठा योजनेतून जुनी पाण्याची टाकी, मंगल कार्यालयाजवळील पाण्याची टाकी, गणेश नगरमधील पाण्याची टाकी भरली जाते. त्यातून गणेशनगर, रामनगर, शिवाजीनगर आणि गावात पाणीपुरवठा केला जातो. सध्याची योजना कळवण शहराच्या दृष्टीने परिपूर्ण नाही. त्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत नसल्याने कळवणकरांना बोअरवेलच्या अशुद्ध पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

शहरातील बालाजी मंदिर रोड, पाटील गल्ली, विठ्ठल मंदिर, कोर्ट परिसर, रेणुका कॉलनी, गणपती मंदिर, फुलाबाई चौक, जैन कॉलनी, गजानन कॉलनी, अयोध्या नगर, सुभाष शिरोडे कॉलनी, राज चौक, कैलास जाधव निवास, स्वामी समर्थ मंदिर (शिवाजीनगर), संभाजीनगर, रामनगर, कुलस्वामीनी कॉलनी, आदिवासी वस्ती, राजवाडा, गांधीचौक, पोखऱ्या डोंगर, गट नं. ३२ आदी परिसरात बोअरवेलचा पाणीपुरवठा केला जात आहे.

पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था

चणकापूरचे आवर्तन सोडल्यानंतर अर्जुन (नकट्या) बंधाऱ्याजवळील गिरणा नदीपात्रातील योजनेला दिलासा मिळतो. परंतु, गिरणा नदीपात्र कोरडेठाक होत असल्यामुळे दिलासा फार काळ टिकत नाही. शहरात पाणीटंचाई डोके वर काढते. परिणामी, नगरपंचायत प्रशासनाला कसरत करावी लागते. नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या विहिरीवरून कळवण शहरातील विविध भागात पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे पाणीटंचाई भासत नाही. खंडू निकम आणि गणेश निकम यांच्या खासगी विहिरीतून नव्याने विकसित झालेल्या शिवाजीनगर भागात पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे पाण्याची ओरड होत नाही.

लोकसंख्या (२०११ जनगणनेनुसार) : २०५४१

नळ कनेक्शनधारक : २४५१

दरमहा विद्युत बील : दोन लाख रुपये

borewell water
पावसाळ्यात गेल्यावर्षीपेक्षा 244 टँकरद्वारे अधिक पाणीपुरवठा

"कळवणवासीयांची पाण्याची गरज पूर्ण करण्यात नगरपंचायत असमर्थ ठरत आहे. शहरात नागरी वस्ती वाढत आहे. काही भागांमध्ये हातपंप (बोअरवेल) किंवा विहिरीच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने कळवण शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर पाणी प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे."

- कौतिक पगार, नगराध्यक्ष, कळवण

"शहरातील विविध भागांमध्ये बोअरवेल्स, हातपंप, विहिरींच्या पाण्याचा वापर होत आहे. परंतु, या पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढलेले असल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते. पाणीपातळी खाली गेल्याने क्षारांचे प्रमाण वाढत आहे. विविध भागात टीडीएसची तपासणी केली असता क्षारांच्या प्रमाणाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते."

- डॉ. सचिन पटेल, मुख्याधिकारी, कळवण

borewell water
वरुणराजाच्या हजेरीनंतरही 3 तालुक्यात कमी पाऊस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com