PFI Case : Social Mediaवर चिथावणी अन्‌ सांकेतिक भाषा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PFI News

PFI Case : Social Mediaवर चिथावणी अन्‌ सांकेतिक भाषा

नाशिक : मालेगावच्या जामा मशिदीचा मौलाना इरफान दौलत खान नदवी याच्या चौकशीतून नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) गंभीर बाबींची उकल झाली आहे. समाजात अशांतता निर्माण करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर चिथावणीखोर संदेश व्हायरल करण्यासह, उर्दू भाषेत संशयास्पदरित्या सांकेतिक भाषेतील संवाद एटीएसच्या हाती लागले आहेत. मौलाना नदवी हा पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडियाचा (पीएफआय) २०१९ पासून सक्रिय सदस्य असून, तो या संघटनेचा माजी जिल्हाध्यक्षही आहे. (PFI Case Provocation and Sign Language on Social Media Nashik News)

मौलाना इरफान दौलत खान नदवी (३५, रा. गुलशेर नगर, मालेगाव) यास नाशिक एटीएसच्या पथकाने रविवारी (ता. १३) अटक केली. मौलान नदवी हा पीएफआय या संघटनेचा २०१९ पासून सक्रिय सदस्य सध्या तो मालेगाव समन्वयक आहे. गेल्या काही आठवड्यांपासून एटीएसच्या पथकाकडून मौलाना नदवी याची चौकशी केली जात होती. त्यातून काही बाबी समोर आल्याने अखेर एटीएसने त्यास अटक करून त्याच्याकडील मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व संशयास्पद माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. सोशल मीडियावर चिथावणीखोर संदेश व्हायरल करीत त्याने मुस्लिम समाजात असुरक्षितता निर्माण केली.

तसेच, समाजात सशस्त्र जातीय संघर्षाला खतपाणी घालून हिंसक कारवाया घडवून आणण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आले आहे. मौलानाच्या आवाजाचे नमुने तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला देण्यात आले आहेत. त्यातून आणखीही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता एटीएसने वर्तविली आहे. मालेगावातून पीएफआयची जी ऑनलाईन मिटिंग झाली होती, त्या मिटिंगमध्ये मौलाना अन्सारीसह मौलाना नदवीही सहभागी होता. तसेच, एटीएसच्या चौकशीमध्ये अटकेत असलेल्या पीएफआयच्या सदस्यांच्या संपर्कात मौलाना नदवी होता, असेही समोर आले आहे.

हेही वाचा: Nashik : पोलिस निरीक्षक कदमांच्या आत्महत्त्येचे गूढ कायम

चिथावणीखोर आंदोलने

संशयित मौलाना इरफान नदवी याने भाजपाच्या नुपूर शर्मा प्रकरणानंतर औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड या ठिकाणी आंदोलनांमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘गुस्त के नबी की एक ही सजा सर तन से जुदा’ असा उर्दू भाषेतून चिथावणीखोर संदेश व्हायरल केला होता. त्याचप्रमाणे, काही संभाषणांमध्ये त्याने सांकेतिक भाषांचा वापर केला असून, त्याचा तपास करण्यासाठी एटीएसने न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली.

अटकेतील संशयितांच्या संपर्कात

पीएफआयच्या ज्या पाच सदस्यांना नाशिक एटीएसने अटक केली आहे, त्यांच्या सतत संपर्कात मौलाना नदवी होता. त्यांच्यात सुमारे ५५० संवाद झालेले आहेत. तर, राज्यभरातून अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या संशयितांच्याही संपर्कात मौलाना नदवी होता. त्यांच्याशीही त्याचे ६५० संवाद झाल्याचे एटीएसच्या तपासातून समोर आले असून, मौलाना मोबाईल फोनही जप्त करण्यात आलेला आहे. तसेच, टेरर फंडिंगचाही संशय सरकारी पक्षातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

एटीएसकडून अटक करण्यात आलेले

मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (२६, मालेगाव, जि. नाशिक), अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८, रा. कोंढवा, पुणे), रझी अहमद खान (३१, रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर), उनैस उमर खय्याम पटेल (३२, रा. जळगाव).

हेही वाचा: Nashik : आठवडे बाजारात भाजीपाला मातीमोल