जळगावात आजपासून
पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा
३३४६ विद्यार्थ्यांची नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२७ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) २०२६ चे आयोजन २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी एकूण तीन हजार ३४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ४० विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
विद्यापीठात पीएच.डी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित केली जाते. त्यानुसार यंदाची पेट परीक्षा विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा केंद्रात घेतली जाणार आहे. संशोधन क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.
प्रवेशपत्रे लॉगिनवर उपलब्ध
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे त्यांच्या ऑनलाइन लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी आणि किती वाजता आहे, याची खात्री करून घ्यावी.
परीक्षेला उपस्थित राहताना निर्धारित वेळेचे पालन करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ४० विषयांसाठी होणाऱ्या या परीक्षेच्या माध्यमातून पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.