NSK26H34551
जळगाव : कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांना निवेदन देताना भूषण लाडवंजारी व अॅड. राहुल वाकलकर.
पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांचे
प्रश्न लवकरच मार्गी लागणार
कुलगुरु प्रा. माहेश्वरी : लाडवंजारी, अॅड. वाकलकरांचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना महाज्योती, सारथी व इतर संस्थांच्या फेलोशिप मिळविताना येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी भाजपचे जळगाव जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी व अॅड. राहुल वाकलकर यांनी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
सन २०२५-२६ मध्ये पीएच.डी. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र व कायमस्वरूपी प्रमाणपत्र यातील तांत्रिक विसंगतींमुळे फेलोशिप अर्ज प्रक्रियेत अडचणी येत आहेत. परिणामी, पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहण्याची किंवा नामंजूर होत आहे तसेच नामंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांची नोंदणी तारीख २० मे २०२५ नमूद करून सुधारित पुष्टीकरण पत्र देणे, दोन्ही प्रमाणपत्रे फेलोशिपसाठी ग्राह्य धरणे तसेच महाज्योती, सारथी व इतर संस्थांशी समन्वय साधून फेलोशिपचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
भूषण लाडवंजारी व अॅड. राहुल वाकलकर यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी संशोधक विद्यार्थी अनिल हाडे, जगदीश डुगले, पल्लवी सोनवणे उपस्थित होते.
चौकट
सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
यावेळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्या लवकरच सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.