तीर्थक्षेत्र पिंपळगाव घडविण्यासाठी योगदान द्या
जिल्हाधिकारी प्रसाद : स्वच्छता योद्ध्यांशी साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : स्वच्छ, सुंदर, निरोगी व कचरामुक्त पिंपळगाव बसवंत शहराच्या निर्मितीसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. ‘आमचे पिंपळगाव-आमचे तीर्थक्षेत्र’ या संकल्पनेतून शहराच्या स्वच्छतेसाठी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छता ही सेवा-२०२६ अंतर्गत पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या ७२ स्वच्छतायोद्ध्यांशी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी गुरुवारी (ता. ८) संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडलेल्या या संवादप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, नगरविकास शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी, पिंपळगाव बसवंतच्या मुख्याधिकारी श्रिया देवचके, नगर परिषद उपाध्यक्ष सतीश मोरे, नगरसेवक नीलेश पाटील, तौसिफ मन्सुरी, इमरान कोतवाल आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की सफाई मित्र सुरक्षा व सन्मान शिबिर उपक्रमातून जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात येत आहे. त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, समस्या तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासन माहिती जाणून घेत आहे. शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर आवश्यक उपाययोजनांसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही या वेळी प्रसाद यांनी सांगितले.
‘आमचे पिंपळगाव-आमचे तीर्थक्षेत्र’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनांचा लाभ घ्यावा. तसेच आयुष्मान भारत कार्ड घेताना किमान वेतनाच्या तरतुदींची माहिती घ्यावी आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रसाद यांनी केले.
------------
-----------
फोटो क्रमांक : एच-31749