धुळे ः टुडे १ ला
--
पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी
बळकावण्याचा कट उघडकीला
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : पिंपळनेर (ता. साक्री) येथील पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळविण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे, खोटे शिक्के व लेटरपॅडचा वापर करून बनावट सभा दाखविल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांताराम ताराचंद सोनवणे (रा. सटाणा रोड, पिंपळनेर) व भागवत भानुदास सोनवणे (रा. देवपूर, धुळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी आपसात संगनमत करून संस्थेची सूत्रे हाती घेण्यासाठी कट रचला. त्यांनी २१ सप्टेंबर २०२५ रोजी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीची वार्षिक किंवा विशेष सभा पार पडल्याचे भासविले. या सभेला २७ सभासद उपस्थित असल्याचे दाखवत त्यांच्या बनावट सह्या, संमतीपत्रे आणि सभेचा खोटा वृत्तांत तयार केला. एवढेच नव्हे तर ही बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून संस्थेच्या नावाने अधिकृत पत्रव्यवहार आणि प्रसिद्धीही केली.
संस्थेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ताबा मिळविण्याच्या उद्देशाने संशयितांनी धुळे सहायक धर्मादाय आयुक्तांकडे फेरफार अर्ज क्रमांक १६७/२०२६ दाखल केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संस्थेचे विश्वस्त विवेकानंद नारायण शिंदे (रा. नवापूर रोड, पिंपळनेर) यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांनी शांताराम सोनवणे व भागवत सोनवणे यांच्याविरुद्ध फसवणूक, कूटरचना व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.