(पान १ ला मेन)
फोटो : 32627/ NSK26H32628
पिंपळोद : निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देताना ग्रामस्थ. दुसऱ्या छायाचित्रात घरांचे झालेले नुकसान.
-----------------
रस्त्याच्या कामात घरे, दुकाने उद्ध्वस्त
मौजे पिंपळोद येथील ग्रामस्थांची तक्रार; ठेकेदारावर कारवाईसह नुकसानभरपाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १७ : नंदुरबार ते धानोरा रस्त्याच्या काँक्रिटीकरणादरम्यान मौजे पिंपळोद येथील वडिलोपार्जित घरे, दुकाने आणि गोदामांचे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी नोटीस न देता जेसीबीच्या साहाय्याने मालमत्तांचे नुकसान करण्यात आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, योग्य नुकसानभरपाई व जागेचा मोबदला द्यावा, तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
----------
‘एमएसडीआयसी’मार्फत नंदुरबार ते धानोरा रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. हा रस्ता पिंपळोद गावातून जात असून, रस्त्यालगत अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची वडिलोपार्जित घरे, दुकाने आणि गोदामे आहेत. ही मालमत्ता संबंधित कुटुंबांच्या निवासाचे आणि उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, रस्त्याच्या कामादरम्यान कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या साहाय्याने या मालमत्तांचे नुकसान करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक विकासकामांना ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र, विकासकामे करताना नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण, सुरक्षितता आणि कायदेशीर हक्कांचा विचार होणे आवश्यक आहे. संबंधित मालमत्तांची कागदपत्रे तपासणे, मालकांना पूर्वकल्पना देणे आणि नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. या प्रक्रियेचे पालन न करता मालमत्तांचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
निवेदनावर पुरुषोत्तम काळे, दीपक गिरासे, महेंद्र काळे, मनीष शर्मा, अश्विन पाटील, नीलेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नुकसानीचे मूल्यांकन करून भरपाई द्या
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित सक्षम यंत्रणेच्या अधिकाऱ्यांमार्फत नुकसानीचे पंचनामे करावेत. सक्षम अधिकाऱ्यांकडून नुकसानीचे मूल्यांकन करून संबंधितांना योग्य नुकसानभरपाई द्यावी. तसेच, जागेच्या मोबदल्याबाबतही नियमानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. चौकशीत निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदार, जबाबदार अधिकारी आणि इतर संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.