पान चार
---------------
10301
पिंपळगाव बसवंत : विविध मागण्यासाठी बस आगाराच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करताना कामगार.
एसटी कर्मचाऱ्यांचे पिंपळगाव आगारात घंटानाद आंदोलन
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी; संघटनेचा राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा;
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. ३ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवारी (ता.३) पिंपळगाव बसवंत एसटी आगाराच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पिंपळगाव आगाराचे अध्यक्ष रवींद्र खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनात आगारातील सर्व पदाधिकारी, सभासद तसेच कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी घंटानाद करून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, दिवाळी भेट व सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा करावी, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, वेतनवाढीतील त्रुटी दूर कराव्यात, प्रलंबित आर्थिक देणी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, यांसह विविध मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.