PML26B10321
पिंपळगाव बसवंत ः जलवाहिनीचे भूमिपूजन करताना नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे. शेजारी उपनगराध्यक्ष सतीश मोरे, विश्वासराव मोरे, संदीप सुराणा आदी.
---
पिंपळगावात आठ महिन्यांत
सहा कोटींची विकासकामे
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. ८ ः शहरात गेल्या आठ महिन्यांत सहा कोटी रुपयांच्या विकासकामांना मूर्त स्वरूप आले आहे. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनापलीकडे विकासकामे सुरू आहेत. चिंचखेड रस्त्यावरील जलकुंभाला जोडणारी जलवाहिनी नव्हती. त्या कामाचा श्रीगणेशा झाल्याने विशेषतः चिंचखेड रस्त्यावरील नागरिकांना नळजोडणी देऊन मुबलक पाणीपुरवठा करता येणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून पिंपळगाव नगर परिषदेला भरघोस निधी येत असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी केले.
चिंचखेड रस्त्यावरील जलकुंभ ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. विश्वासराव मोरे, साहेबराव मोरे, ‘नामको’चे उपाध्यक्ष संदीप सुराणा, राष्ट्रवादीचे गटनेते गणेश बनकर उपस्थित होते. उपाध्यक्ष मोरे म्हणाले, की पिंपळगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रभाग चारपासून सुरू झालेल्या विकासकामाचा झंझावात सर्वदूर पोहचत आहे. घनकचरा प्रकल्पाला सात कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच त्याही कामाला सुरुवात होईल. राज्य शासनाकडून वीस कोटी रुपये विविध विकासकामांसाठी मंजूर झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे म्हणाले, की पिंपळगाव शहराला इंदूर शहरासारखे स्वच्छ व सुंदर करण्याच्या संकल्पाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
चिंचखेड रस्त्यावरील जलकुंभाला जोडणाऱ्या जलवाहिनीमुळे परिसरातील नागरिकांना नळजोडणी देऊन तहान भागविली जाणार आहे. नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, शिवसेनेचे युवानेते राजेश पाटील, किरण लभडे यांनी दिवाळीला विकासाची गोड भेट पिंपळगावकरांना दिली.
या वेळी रवींद्र मोरे, सुरेश खोडे, बापूसाहेब पाटील, संपतराव विधाते, डॉ. किरण पवार, डॉ. अरूण गचाले, गणपत विधाते, उल्हास मोरे, नीलेश पाटील, महेश आहिरे आदी उपस्थित होते.