फोटो ओळी : 02220
ब्राह्मणगाव : पर्यावरण संवर्धन मोहिमेतर्गत साई इंटरनॅशनल स्कूलतर्फे जनजागृती व पथनाट्य सादर करताना विद्यार्थी.
साई इंटरनॅशनल स्कूलतर्फे
जनजागृती रॅली, पथनाट्य
ब्राह्मणगाव, ता. २ ः यशवंतनगर (लखमापूर) येथील साई इंटरनॅशनल स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजतर्फे जनजागृती रॅली व पर्यावरण संवर्धन मोहीम राबविण्यात आली. ‘प्लॅस्टिकमुक्त गाव’ आणि ‘पर्यावरण संवर्धन’ हा मुख्य संदेश रॅलीतून देण्यात आला. रॅलीत विद्यार्थ्यांनी पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली.
रॅलीची सुरुवात हिरवी झेंडी दाखवून झाली. शाळेच्या प्रांगणातून निघालेली ही रॅली गाव बसस्थानक परिसर आणि प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘एकच निर्धार, प्लॅस्टिकचा वापर टाळणार’, ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुवला होता. वाढत्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे शेती, जमीन आणि आरोग्यावर होणारे घातक परिणाम रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक, दुकानदार आणि आठवडे बाजारात तसेच रोज सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
गावातील मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात पावसाच्या पाण्याचे नियोजन, ठिबक व तुषार सिंचनाचा योग्य वापर आणि पाण्याचा अपव्यय टाळणे. केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगवण्याची जबाबदारी घेणे, या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. पथनाट्य पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. रॅली यशस्वितेसाठी नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शेतकरी बांधव, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
..........