टूडे साठी
---------------
पीएम बससेवेचे
अनुदान रखडणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पीएम ई-बस सेवेसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक साहाय्य वितरणाला ब्रेक लागला आहे. निधी वितरणासाठी आवश्यक असलेली अनिवार्य कागदपत्रे महापालिकेने वेळेत सादर न केल्याने केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने नाशिक महापालिकेसह महाराष्ट्रातील सहा महापालिकांना सात दिवसांत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे स्पष्ट निर्देश देत मंत्रालयाने स्मरणपत्र जारी केले आहे.
मंत्रालयाने यापूर्वी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी याच संदर्भात पत्र पाठवून कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र महिनाभर उलटूनही संबंधित शहरांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केंद्राने पुन्हा स्मरणपत्र पाठविले. पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत बस संचालनासाठी आगाऊ आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी काही अनिवार्य अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यात एस्क्रो करार, बसच्या व्यावसायिक संचालनाच्या तारखेचा पुरावा, एस्क्रो खात्याचा तपशील व बँकेचे समर्थनपत्र, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर एस्क्रो खाते मॅप केल्याचा स्क्रीनशॉट आणि डायरेक्ट डेबिट मेकॅनिझम यासंबंधीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे अद्याप मंत्रालयाला प्राप्त झालेली नसल्याने संबंधित शहरांमध्ये बससेवा सुरू झाली असली, तरी कागदपत्रे मिळेपर्यंत आगाऊ निधी वितरणाची प्रक्रिया पुढे नेता येणार नसल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे नाशिकमधील ई-बस सेवेसाठी केंद्राच्या साहाय्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील ठाणे, नागपूर, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक आणि कोल्हापूर या सहा महापालिकांचा उल्लेख आहे.
------------------