वणीजवळ चारचाकीतून गोवंशांची सुटका
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. २ : रात्रीच्या वेळी भरधाव जाणाऱ्या संशयित चारचाकीचा पाठलाग करून वणी पोलिसांनी चार गोवंशांची निर्दयतेने होणाऱ्या वाहतुकीतून सुटका केली. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वणी ते पिंपळगाव रोडवरील खेडगाव शिवारामधील हॉटेल जगदंबासमोर करण्यात आली. या कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन गाडी चालक घटनास्थळावरून पसार झाला.
पोलीस शिपाई मच्छिंद्र पिठे आणि त्यांचे सहकारी ३१ ऑक्टोबरच्या रात्री वणी गावात गस्त घालत होते. रात्री १२:१० वाजेच्या सुमारास सापुतारा बाजूकडून वणी बाजूकडे येणारी एक चारचाकी (एमएच १५ सीटी ३५७२) भरधाव जाताना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडीचा वेग वाढवून पिंपळगावच्या दिशेने पळ काढला. पोलीस पथकाने तत्काळ सरकारी वाहनाने पाठलाग करत खेडगाव शिवारात हॉटेल जगदंबासमोर इको गाडीला ओव्हरटेक करून रोखले. गाडी थांबताच चालक अंधाराचा फायदा घेत गाडी सोडून पळून गेला. गाडीची पाहणी केली असता, त्यात ४ गोवंश जातीची जनावरे तोंड व पाय क्रूरतेने बांधलेल्या अत्यंत वाईट स्थितीत आढळून आली.
१ लाख २० हजार रुपये किमतीची कार व सुमारे ६० हजार रुपये किमतीची ४ गोवंश जनावरे असे एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दरम्यान सुटका करण्यात आलेल्या जनावरांना चारा-पाण्याची सोय करण्यासाठी वणी येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.