NSK26H32023
जळगाव : ट्रकची तपासणी करताना पोलिस.
---------------
जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त
ऑपरेशन ऑल आऊट मोहीम
----------
नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहनांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे ऑपरेशन ऑलआऊट मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी एकाच वेळी धडक तपासणी, नाकाबंदी केली. यात ड्रंक ॲन्ड ड्राईव्हपासून ते थेट सराईत गुन्हेगारांची तपासणी व कारवाई करण्यात आली. यात जिल्ह्यातील ३५ पोलिस ठाण्यांसह वाहतूक विभागाने रात्रभर कारवाईचा धडाका सुरू ठेवला.
अवैध गावठी हातभट्टी दारूविरोधात कारवाई करीत ११८ गुन्हे दाखल करून ११८ संशयितांना अटक केली. पाच हजार ७७ लिटर गावठी दारू, रसायन व साहित्य, असा एकूण पाच लाख ७ हजार ४८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारू विक्री करणाऱ्यांवर ४ गुन्ह्यांत पाच संशयितांवर कारवाई केली. जुगार कायद्यांतर्गत ७२ गुन्ह्यांत ८५ संशयितांवर कारवाई करीत ५१ हजार २५५ रुपयांची रोकड व जुगार साहित्य जप्त केले. देशी पिस्तूल, तलवार जप्त केली. वीजपंप व वायर चोरीचा १ गुन्हा उघडकीस आणून १ पंप व १ दुचाकी, असा २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
बेपत्ता व्यक्तींचा शोध
विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या ६२ महिला, ४६ पुरुष, ३० मुली व २ मुले, अशा एकूण १०८ हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. अवैध वाळूविरोधात १ गुन्हा दाखल करून १ संशतियाकडून सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
बेशिस्त वाहतूक
मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक शाखेकडून १२९८ केसेस करून १० लाख ४४ हजार ८७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक विभागवगळता पोलिस ठाण्यांतर्गत ७७८ केसेसमध्ये ५ लाख ८९ हजार ४० रुपयांची दंड वसुली करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर ३६ केसेस व मद्यपान करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर ३५ केसेस दाखल केल्या.
इतर प्रतिबंधक कारवाया
अंमली पदार्थांविरुद्ध १६ गुन्ह्यांत १६ संशयितांवर कारवाई झाली. १० संशयितांना जेरबंद केले. महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२अन्वये तडीपार गुन्हेगारांवर सहा कारवाया केल्या. शिवाय १०९ भंगार दुकानांची व ६७ हॉटेल- ढाब्यांची तपासणी केली.
समन्स बजावणी
तंबाखू निर्मूलन मोहिमेंतर्गत कोटपा कायद्यान्वये १०८ केसेस केल्या व १०० मीटर परिसरातील ११ पानटपऱ्या निष्कासित केल्या. समन्स व वॉरंटच्या ४६८ बजावणी केल्या. सायबर रील्सबाबत २६ खाती ब्लॉक केली. या कारवाईत पोलिस अधीक्षक श्रीकांत थिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, अशोक नखाते इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.