धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33200
धुळे : पोलिस स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात उपस्थित प्रमुख जिल्हा न्यायाधीश समृद्धी संजय भिष्म. शेजारी पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, समादेशक प्रभाकर शिंदे आदी.
--
पोलिस दलाकडून हुतात्म्यांना मानवंदना
--
धुळ्यात पोलिस स्मृती दिन साजरा; शहिदांच्या शौर्यचे स्मरण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : देशाची आंतरिक सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहिदांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी बुधवारी (ता. २१) पोलिस मुख्यालय येथे ‘पोलिस स्मृती दिन’ पाळण्यात आला. या वेळी कर्तव्यपथावर प्राण पणाला लावणाऱ्या शहिदांना पोलिस दलाच्या वतीने लष्करी शिस्तीत मानवंदना देण्यात आली.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश समृद्धी संजय भिष्म, पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, राज्य राखीव पोलिस गट क्रमांक सहाचे समादेशक प्रभाकर शिंदे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, पोलिस उपअधीक्षक (गृह) ज्ञानेश्वर जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, मानव संसाधन शाखेचे निरीक्षक विलास पवार यांच्यासह विविध पदाधिकारी, पोलिस व मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी, धुळे पोलिस व निमलष्करी दलातील शहिदांचे कुटुंबिय उपस्थित होते. पोलिस जवानांचे जीवन सदैव आव्हानात्मक असते. कायदा- सुव्यवस्था राखताना त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान कधीही विसरता येणार नाही. कुटुंबाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या वीर जवानांचे शौर्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना या वेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश भिष्म यांनी व्यक्त केली.
-
स्मारकावर पुष्पहार अर्पण
२१ ऑक्टोबर १९५९ ला लडाखमधील ‘हॉट स्प्रिंग्ज’ येथे चिनी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या १० शूर पोलिस जवानांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. गेल्या एका वर्षात (१ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६) देशात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना बलिदान दिलेल्या सर्व शहिदांच्या नावांचे वाचन करून त्यांना नमन करण्यात आले. पोलिस मुख्यालयातील शहीद स्मारकावर पुष्पहार अर्पण करण्यात आला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलिस मुख्यालय व पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या पथकाने शहिदांना शोक सलामी दिली. राखीव पोलिस निरीक्षक मुकेश माहुले यांनी शोक सलामी परेडचे नेतृत्व केले.
-