
पुढील 3 महिने पोलीसांची कसोटी! साप्ताहिक सुट्यांवरही फुली
पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : सदरक्षणाय, खलनिग्रणाय हे ब्रीद घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे व्रत जोपासणाऱ्या पोलिसांसाठी (maharashtra police) आगामी तीन महिने अग्निदिव्याचे ठरणार आहेत. कोरोनाची स्थिती आटोक्यात आली असताना थोडी उसंत मिळणार अशी आशा होती. परंतु, कोरोनाची पर्वा न करता जिल्ह्यात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे, त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पुढील तीन महिने सण-उत्सव असल्याने पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या सुट्टी व रजेवर फुली मारली आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची किमया
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनमुळे पहिल्या फळीतील योद्धे म्हणून पोलिस बंदोबस्तात होते. लॉकडाऊन काळात तर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची किमया पोलिस दलाने केली आहे. गणेशोत्सवापासून तीन महिने खडा पहारा द्यावा लागणार आहे. जिल्ह्यातील सुमारे चार हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्त हाच सण-उत्सव असणार आहे. नाशिक जिल्ह्यात ४० पोलिस ठाणे आहेत. यात सुमारे ४५० पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक तर साडेतीन हजार पोलिस हवालदार आहेत. यातील बहुतांश पोलिस कर्मचारी आता गणेशोत्सव बंदोबस्तात गुंतले आहेत. पुढील पाच दिवस डोळ्यात तेल घालू रस्त्यावर तैनात राहणार आहेत. शिवाय नांदगावसह जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाहणीसाठी मंत्री येत आहे. त्यांच्याही बंदोबस्ताचा ताण असणार आहे.
हेही वाचा: मनमाड रेल्वे स्थानकाची कसून तपासणी; सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त
रजा व साप्ताहीक सुट्टी बंद
पोलिसांच्या ड्युटीत साप्ताहीक सुट्टी किंवा सर्वच प्रकारच्या रजा घेता येणार नाही. सतत बंदोबस्तात असल्याचा परिणाम आरोग्यावर होतो. बंदोस्तामुळे अनेक पोलिस अंगावर आजार काढतात, त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न पोलिसांना नेहमीच भेडसावतो. बंदोबस्तामुळे वडील किवा आई व्यस्त असल्याने मुलांना कुठेही जाता येत नाही. वेळ न दिल्यामुळे नातेवाईक नाराज होतात.
पोलिसांची डोकेदुखी वाढली
कोरोनाची स्थिती आटोक्यात आली असताना थोडी उसंत मिळणार अशी आशा होती. परंतु, कोरोनाची पर्वा न करता जिल्ह्यात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे, त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पुढील तीन महिने सण-उत्सव असल्याने पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या सुट्टी व रजेवर फुली मारली आहे. गणेशोत्सवाची धामधुम संपल्यानंतर लगेच ७ आॅक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यासाठी पुन्हा पंधरा दिवस डोळ्यात तेल घालून बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागेल. नवरात्रोत्सवा दरम्यान आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात १५ तारखेला दसरा, त्यानंतर १९ ला ईद आहे. त्यानंतर दिवाळी सण असेल. या काळात पोलिसांना थोडीही उसंत मिळणार नसल्याने तीन महिने त्यांच्यासाठी धामधुमीचे असतील.
हेही वाचा: आमदार देवयानी फरांदेंच्या पवित्र्याने नाशिकमध्ये भाजप अडचणीत
समाजाचे संरक्षण करण्याचे व्रत पोलिसांनी स्वीकारले आहेत. संकटकाळात नागरिकांचा हक्कांचा मित्र म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. त्यामुळे कुटुंबियाना सण-उत्सवात वेळ देता येत नाही. पण नागरिकांचा आनंद त्या काळात व्दिगुणीत करण्याची जबाबदारी आमच्यावर असते याचा आनंद आहे. पत्नी-मुले सुध्दा आता समजून घेतात. - आर. एम. पाटील, पोलिस पिंपळगाव बसवंत.
Web Title: Police On Duty Continue For Next 3 Months Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..