NSK26H33977
भुसावळ : रेल्वेच्या मैदानावर गुरुवारी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात उमेदवारांची उंची मोजणीचे प्रात्यक्षिक घेताना प्रशिक्षक.
-----------------
पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण
शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
-----
भुसावळला ६००हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ३० : येथील रेल्वे मैदानावर जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरास भुसावळ उपविभागासह परिसरातील ६००हून अधिक इच्छुक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला.
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे व पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित व भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर झाले. यात अधिकृत पोलिस भरती नियमांनुसार उमेदवारांची उंची व छाती (न फुगवता व फुगवून) कशी मोजली जाते, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवून उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. मैदानी चाचणीत पूर्ण गुण मिळविण्यासाठी गोळा कसा धरावा, फेकताना शरीराचा समतोल कसा ठेवावा व फाऊल कसा टाळावा, याचे अचूक तंत्रशुद्ध प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
कागदपत्रांची पडताळणी
भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक असणारे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलीयर, शैक्षणिक कागदपत्रे आदींची वेळेत पूर्तता करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या.
लेखी, मैदानी परीक्षा तयारी
लेखी परीक्षेतील सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता, गणित व मराठी व्याकरण या विषयांची तयारी, वेळेचे व्यवस्थापन, मैदानी चाचणीसाठी शारीरिक तंदुरुस्ती राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रक्रियेची अचूक माहिती
‘आजची तयारी...उद्याचा पोलिस अधिकारी’ या उद्देशाने ग्रामीण व शहरी भागातील भावी उमेदवारांना भरतीप्रक्रियेची अचूक माहिती मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी या शिबिराचे आयोजन होते. या शिबिरासाठी भुसावळ उपविभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.