फोटो- 07523
सटाणा : बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलताना माजी आमदार संजय चव्हाण. शेजारी तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष भारत काटके, मनोज सोनवणे, संजय पवार आदी.
मतदारसंघ फेररचनेला सर्वांनी विरोध करावा
माजी आमदार चव्हाण ः बागलाण तालुका राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसची बैठक
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. १६ : मतदारसंघ फेररचना घटनादुरुस्ती विधेयकाच्या नावाखाली लोकसभेसह विधानसभेतील जागांची संख्या वाढवून देशातील प्रादेशिक पक्षांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा आणि विरोधकांचे प्रतिनिधित्व मर्यादित करून सत्ताधारी भाजपला राजकीय लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असून, या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे लोकशाही मूल्यांशी आणि राज्यघटनेशी प्रतारणा ठरेल. लोकशाही टिकविण्यासाठी या विधेयकातील तरतुदींना जनतेसह सर्वच राजकीय पक्षांनी विरोध करावा, असे आवाहन माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले.
मतदारसंघ फेररचना घटनादुरुस्ती विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, की आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या देशावर लोकप्रतिनिधींची संख्या वाढवून वेतन, भत्ते व सुविधांचा अतिरिक्त आर्थिक भार टाकणे योग्य नाही. हे विधेयक राज्यघटनेच्या मूल्यांना धक्का देणारे ठरू शकते. तालुकाध्यक्ष केशव मांडवडे म्हणाले, की मतदारसंघ वाढीच्या प्रक्रियेत प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधित्व कमी होणार आहे. त्यामुळे या पक्षांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊन बहुपक्षीय लोकशाहीचे संतुलन बिघडू शकते. या विधेयकाचा सर्वंकष विचार व्हावा.
शहराध्यक्ष भारत काटके म्हणाले, की आमदार-खासदारांची संख्या वाढल्यास वेतन, भत्ते, निवास व कार्यालयीन सुविधांवरील खर्च वाढेल. त्यामुळे सार्वजनिक तिजोरीवरील भार वाढू शकतो. शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे म्हणाले, की विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व मर्यादित होऊन सत्ताधारी पक्षाला लाभ होणार असेल, तर तो लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवरील हा आघात आहे.
तालुका कार्याध्यक्ष संजय पवार व युवक तालुकाध्यक्ष चेतन वणीस यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे, महिला तालुकाध्यक्षा उषा भामरे, युवक शहराध्यक्ष मयूर अहिरे, नानाजी दळवी, दिलीप सोनवणे, दिनेश सोनवणे, राजेंद्र जाधव, नितीन मांडवडे, किरण पाटील, गौरव सोनवणे, अमोल बच्छाव, रामकृष्ण अहिरे, रेखा शिंदे, वंदना बिरारी, संजय बिरारी, संजय वाघ, युवराज निकुंभ, विलास सोनवणे आदी उपस्थित होते.