esakal | डाळिंब छाटणीचा मराठवाड्यात अधिक मोबदला! कसमादेच्या कुशल कामगारांना ‘अच्छे दिन'
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (49).jpg

कसमादेतील डाळिंबावरील कुशल कामगारांना ‘अच्छे दिन' आले आहेत. छाटणीसाठीचा मोबदला कसमादेपेक्षा मराठवाड्यात जवळपास दुपटीने मिळत आहे. त्यामुळे कुशल कामगारांची छाटणीसाठी मराठवाड्यासह गुजरात, राजस्थानला पसंती आहे.

डाळिंब छाटणीचा मराठवाड्यात अधिक मोबदला! कसमादेच्या कुशल कामगारांना ‘अच्छे दिन'

sakal_logo
By
गोकुळ खैरनार

मालेगाव (जि.नाशिक) : डाळिंबावरील तेल्या व मर रोग नियंत्रणात आल्याने पिकाचे क्षेत्र हळूहळू वाढू लागले आहे. कसमादेसह राज्यात क्षेत्र वाढत असल्याने कसमादेतील डाळिंबावरील कुशल कामगारांना ‘अच्छे दिन' आले आहेत. छाटणीसाठीचा मोबदला कसमादेपेक्षा मराठवाड्यात जवळपास दुपटीने मिळत आहे. त्यामुळे कुशल कामगारांची छाटणीसाठी मराठवाड्यासह गुजरात, राजस्थानला पसंती आहे. डाळिंबाच्या छाटणीचे काम वर्षभर सुरू असते. त्यामुळे कसमादेतील १५ हजारांवर छाटणी कामगारांना नेहमीच मागणी राहिली आहे. 

डाळिंबावरील कुशल कामगारांना ‘अच्छे दिन'
फळशेतीत डाळिंब नेहमीच परवडणारे फळपीक म्हणून ओळखले जाते. कसमादे परिसर डाळिंबाचे आगार आहे. मर व तेल्या रोगामुळे डाळिंबाला घरघर लागली होती. क्षेत्र व उत्पन्न निम्म्याने कमी झाले होते. अलीकडच्या काही वर्षांत मर व तेल्या रोग नियंत्रणात आल्याने या भागातील डाळिंबबागा पुन्हा बहरू लागल्या आहेत. वर्षापासून डाळिंबाचे भाव टिकून असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. हळूहळू क्षेत्र वाढत असल्याने पीक पूर्वपदावर येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातही डाळिंबाची धूम आहे. डाळिंबावरील कुशल कामगारांची कसमादे ही खाण आहे. त्यामुळे या भागातील कामगारांना राज्यासह गुजरात व राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. 

असा मिळतो मोबदला 
डाळिंब छाटणीचे काम रोजंदारीवर कोणीच करीत नाही. कसमादे परिसरात १५ ते २० रुपये प्रतिझाड याप्रमाणे छाटणीचा दर आहे. लहान झाड असल्यास १५ ते १७ रुपये मिळतात. गुजरात, राजस्थानमध्ये प्रतिझाड २० ते २५ रुपये मजुरी मिळते. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या मराठवाड्यातील पट्ट्यात मजुरांना २५ ते ३० रुपये दरम्यान प्रतिझाडप्रमाणे मजुरी मिळते. लॉकडाउननंतर मजूरदेखील त्या भागात छाटणी कामाला जाण्यास पसंती देत आहेत. वर्षातून किमान एक बहार छाटणी केली जाते. काही शेतकरी बहार छाटणीबरोबरच फळछाटणीही करतात. त्यामुळे कुशल कामगारांना वर्षभर रोजगार उपलब्ध होतो. 


मृगबहार घेत असल्याने आम्ही एप्रिलमध्ये छाटणी करतो. बहार छाटणी व्यवस्थित केल्यास दुसऱ्या छाटणीची गरज भासत नाही. मात्र फळ धरल्यानंतर फळाला इजा होईल, अशा फांद्या व काटे निर्माण झाल्यास फळछाटणी करावी लागते. छाटणी कामात कसमादेतील कुशल कामगार तरबेज आहेत. 
- देवीदास कुमावत, डाळिंब उत्पादक, रावळगाव  
 

loading image