स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

SAKAL - 2021-03-23T084654.673.jpg
SAKAL - 2021-03-23T084654.673.jpg

नाशिक : माणिकलाल दिवटे यांचा रविवार कारंजा परिसरात गिरणीचा व्‍यवसाय असून, येथेच दोन खोल्‍यांच्‍या छोट्याशा घरात ते राहतात. घर छोटे असले तरी स्‍वप्‍न मोठे बघावे अन् या स्‍वप्‍नांचा जिद्दीने पाठलाग करावा हे त्‍यांनी आपल्‍या मुलांना लहानपणापासून शिकविले. आणि त्याच जोरावर मुलांनी सुध्दा भरारी मारली आहे.

स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! 

सनदी लेखापाल (सीए)सारख्या अत्‍यंत कठीण परीक्षेत यश मिळविणे तसे आव्‍हानात्‍मकच. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करूनही यशाची पायरी चढू शकत नाहीत; परंतु अत्‍यंत सामान्‍य कुटुंबातील पूजा माणिकलाल दिवटे हिने प्रसंगी घरातील स्‍वयंपाकगृहात अभ्यास करत खडतर प्रवास पूर्ण करताना सीएच्‍या अंतिम परीक्षेत यश मिळवत यशाचे शिखर गाठले आहे. कष्टकरी गिरणी व्‍यावसायिक असलेल्‍या दिवटेंचे समर्पण, त्‍याग अन् पाठबळामुळे पूजाच नव्‍हे तर तिची मोठी बहीण अन् लहान भावानेही उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली आहे. जिद्द व चिकाटीच्‍या जोरावर कुठलेही ध्येय अवघड नाही, हे सोदाहरण दिवटे कुटुंबीयांनी सिद्ध केले आहे. 

पूजाचा खडतर प्रवास

माणिकलाल दिवटे यांचा रविवार कारंजा परिसरात गिरणीचा व्‍यवसाय असून, येथेच दोन खोल्‍यांच्‍या छोट्याशा घरात ते राहतात. घर छोटे असले तरी स्‍वप्‍न मोठे बघावे अन् या स्‍वप्‍नांचा जिद्दीने पाठलाग करावा हे त्‍यांनी आपल्‍या मुलांना लहानपणापासून शिकविले. वडील माणिकलाल दिवटे आणि आई संगीता दिवटे यांच्‍या परिश्रमांची फलश्रुती झाली असून, पूजाने सीए अंतिम परीक्षेत चारशेपैकी २३५ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. पूजाचे शालेय शिक्षण सारडा कन्‍या विद्यालयातून झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्‍यानंतर सीए शिक्षणाकडे वळण्याचा विचार आला; परंतु सीए होण्याचा प्रवास सोपा नसेल, ही कल्‍पना तिला होती. कुटुंबाकडून मिळालेल्‍या पाठबळाच्‍या जोरावर तिने तयारीला सुरवात केली. त्‍यातच २०१३ मध्ये सीपीटी या प्रवेश परीक्षेत दोनशेपैकी १४५ गुण मिळविताना नाशिकमधील अव्वल पाच विद्यार्थ्यांमध्ये तिने स्‍थान राखले. या यशाने तिचा आत्‍मविश्र्वास वाढला व आणखी जोमाने अभ्यासाला लागली.

कुटुंबीयांची स्‍वप्‍नपूर्ती

दोन खोल्‍यांचे घर असल्‍याने कुटुंबातील अन्‍य सदस्‍य बैठक खोलीत टीव्‍ही बघत असताना, स्‍वयंपाकगृहात पूजा अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आयपीसीसी परीक्षेत पहिल्‍या प्रयत्‍नात आलेल्‍या अपयशाने खचून न जाता, तयारी सुरूच ठेवली. दुसऱ्या प्रयत्‍नात मात्र तिने यश मिळविले. अंतिम टप्प्‍यातील सीए फायनल या परीक्षेत नुकतेच तिने यश मिळविले असून, आपल्‍या कुटुंबीयांची स्‍वप्‍नपूर्ती तिने केली आहे. 

भाऊ, बहीण दोन्‍ही उच्च शिक्षित 
पूजाची मोठी बहीण कल्‍याणी दिवटे हिने औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतून शिक्षण घेतले असून, ती सहा वर्षांपासून नोकरी करते आहे, तर लहान भाऊ शुभमने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून, तो दीड वर्षापासून नोकरी करतो आहे. निकाल जाहीर होताच दिवटे कुटुंबीयांनी जल्‍लोष केला. पूजाला अभिषेक काळे यांच्‍यासह शिक्षकांचे सहकार्य लाभले. 

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com