
नाशिक : महापालिकेत भाजपची सत्ता असताना घरपट्टीमध्ये झालेल्या दरवाढीचे पुनर्विलोकन करून सुधारणा करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात भाजपने वाढ केल्याचा उल्लेख केल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने भाजपवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. (possibility of clash of controversy between BJP CM Eknath Shinde group Nashik Latest News)
राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून भाजपच्या पाठिंब्याने शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आले आहे. सत्ता स्थापन होऊन तीन महिने होत नाही तोच सत्तेची सूत्रे निरंतर हाती ठेवण्यासाठी भाजप व शिंदे गटाकडून प्रयत्न होत आहे. पालकमंत्री पदांचे नुकतेच झालेले वाटप हा त्यातीलच एक भाग मानला जात आहे.
पालकमंत्री पदाच्या वाटपामध्ये नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे राहील असे बोलले जात होते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनही तसे सांगितले गेले. मागील आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाजन यांच्या नावाची घोषणादेखील करण्यात आली होती. परंतु, अर्ध्या तासाने बदललेल्या यादीत दादा भुसे यांच्या नावावर नाशिकचे पालकमंत्री पद आले. त्यामुळे भाजप व शिंदे गटात अलबेल नसल्याचे दिसून आले.
राज्यात आता सत्ता स्थापन झाली असली तरी शिंदे गटातील आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येणारे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची राजकीय कारकीर्द जिवंत ठेवायचे असेल तर त्यांना निवडणुकांमध्ये निवडून आणणे गरजेचे आहे. ही बाब शिंदे गटाला दुर्लक्ष चालणार नाही. त्या पार्श्वभूमीवर शक्य तिथे उमेदवार उभे करून वेळप्रसंगी भाजपचीही दोन हात करण्याची तयारी शिंदे गटाने केल्याचे दिसून येत आहे. नाशिक महापालिकेत संदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये थेट भाजपला अंगावर घेण्यात आले आहे.
घरपट्टी वाढ ठरणार वादाचा मुद्दा
मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेत भाजपची सत्ता होती. या सत्ताकाळात २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये भाजपने घरपट्टी ४०० ते ५०० टक्क्यांनी वाढ केल्याने नवीन गृह खरेदी करणाऱ्या नागरिकांना ३५ ते ४० हजार रुपये घरपट्टी भरावी लागत आहे. त्यामुळे घरपट्टी कराच्या दराचे पुनर्विलोकन करून सुधारणा करणे या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली व विशेष म्हणजे प्रशासनाकडूनदेखील त्याला दुजोरा देण्यात आल्याने घरपट्टीवरून भाजप व शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.