Reality After Corona : मृतांच्या नावे दोनदा मदत, अनेकांना एकदाही नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients Realtives

Reality After Corona : मृतांच्या नावे दोनदा मदत, अनेकांना एकदाही नाही!

नाशिक : कोरोना महामारीला दोन वर्षे उलटूनही प्रशासकीय पातळीवर कोरोनाचे कवित्व कायम आहे. शासनाने मृतांच्या वारसांना पन्नास हजारांच्या मदतीची घोषणा केली. त्यासाठी एकट्या नाशिक जिल्ह्यातून १६ हजारांहून अधिक अर्ज आले. पण त्रुटी पूर्ण होत नसल्याने अठराशेहून अधिक अर्ज विविध टप्प्यांत प्रलंबित आहेत. त्यामुळे मदतीसाठी जिल्हा यंत्रणेकडे उंबरठा झिजविणाऱ्यांच्या रांगा कायम आहेत. (Post corona reality after two years queues continue to help heirs Nashik News)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशिक शहर आणि जिल्ह्यात हाहाकार उडविला. रुग्णालयात जागा नाही, ज्यांना जागा मिळाली त्यांना ऑक्सिजन नाही. ज्यांना ऑक्सिजन मिळाले त्यांना औषध नाही, अशी गत होती. त्यामुळे कित्येक जणांना या साथीमध्ये आपल्या प्राणास मुकावे लागले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. हे पाहता सरकारने मृतांच्या वारसांना ५० हजारांच्या मदतीचा हात दिला. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या १२ ऑक्टोबर २०२१ च्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोविड-१९ या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये ५० हजार सानुग्रह अनुदान वितरण सुरू आहे.

त्रुटी मोठी समस्या

मदतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना अनेकांच्या त्रुटी या मूळ कारणामुळे कोरोनाने मृत झालेल्या वारसांना वर्षानंतरही शासकीय कचेरीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यात, शून्य आणि इंग्रजी ओ यातील फरक व्यवस्थित लिहिला नाही. बँकेच्या खात्याची माहिती भरली नाही. कोरोना मृताचे कागदपत्र अपुरे जोडले. या आणि अशा कारणांमुळे सुरवातीपासून अनेकांना चकरा माराव्या लागल्या.

अनेक समित्यांपुढे हजेरी लावून मदतीसाठी याचना कराव्या लागल्या. काही ठिकाणी एकाच्या मृताच्या नावाने घरातील अनेकांनी अर्ज करीत दोनदा मदतही घेतल्याचे पुढे आले. सगळी प्रक्रिया ऑनलाइन असून, मदतीसाठी ९० दिवसांत अर्ज करण्याचा नियम असला तरी, वर्षानंतरही रांगा कायम आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्याची आपत्ती व्यवस्थापन विभागाची प्रक्रियाही सुरू आहे.

हेही वाचा: Nashik : मुंबईच्या वकिलाची हरवलेली बॅग पोलिसांच्या तप्तरतेने परत

दहा जणांकडून अनुदान वसुली

जिल्हाभरात १६ हजारांहून अधिक कोरोना मृतांच्या वारसांनी शासनाकडे मदतीसाठी अर्ज केले आहेत. त्यात, अर्जातील त्रुटीसह सदोष बँक खाते, अर्ज भरण्यातील त्रुटीसह अनेकांनी दोनदा अनुदान घेतले आहे. ज्यांच्या घरात एकाच व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, परंतु दोनदा अनुदान प्राप्त झाले असेल त्यांनी त्वरित ते अनुदान शासनास परत करावे. अधिक माहितीसाठी नियंत्रण कक्षास संपर्क करावा, असे आवाहन करीत, दोनदा अनुदान घेतलेल्यांकडून पन्नास हजारांच्या अनुदानाच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यात आतापर्यंत दहा जणांनी शासनाला निधी परत केला. तिघांनी संपर्क साधून बँकेतील निधी आल्याच्या माहितीची खात्री करून नंतर परत केला जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मदतीचे अर्ज मदत नामंजूर प्रलंबित

मालेगाव महापालिका १२८२ ८९० २७७ ११५

नाशिक जिल्हा ४५१५ २९५५ ७९१ ७६९

नाशिक महापालिका १०८६० ९१०६ ८०७ ९४७

एकूण जिल्हा १६६५७ १२९५१ १८७५ १८३१

"जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीशिवाय इतरही अनेक पातळ्यांवर अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांचे अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मंजूर झालेले दिसतात. त्या व्यक्तींनी आपले बँक खात्याचे डिटेल कार्यालयात येऊन तपासून घ्यावेत, म्हणजे काही राहिले असेल चुकले असेल तर दुरुस्ती करता येईल. दहा जणांनी दुसऱ्यांदा मिळालेली मदत परत केली आहे." - श्रीकृष्ण देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नाशिक

हेही वाचा: Market Committee Election : यंदाही शेतकरी मतदानापासून वंचित