टुडे २ ॲंकर
---
(टपाल खात्याशी संबंधित एआय चित्रवापरावे)
लोगो : टपाल दिन विशेष
–––
आर्थिक, डिजिटल सेवांमुळे टपालसेवेचे बदलले स्वरूप
पत्र गेले, ‘पोस्ट’ राहिली; कागदपत्रे, विमा-बचत योजनांसाठी आजही टपालसेवेवर विश्वास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : ‘पत्रास कारण की..’, ‘विनंती विशेष..’ या शब्दांनी सुरू होणारा पत्रव्यवहार आताच्या पिढीसाठी आठवणींचाच भाग झाला आहे. एकेकाळी दूरवर असलेल्या आप्तेष्टांची खुशाली कळविण्यापासून प्रेम, भावना आणि सुख- दुःख व्यक्त करण्यापर्यंत पत्रच संवादाचे प्रमुख माध्यम होते. मात्र, आता मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर वाढल्याने टपाल पत्रांचा कमी झाला आहे. असे असले तरीही बदलत्या काळाची गरज ओळखून टपाल विभागाने पारंपरिक पत्रव्यवहारापुरते मर्यादित न राहता बँकिंग, विमा, बचत योजना आणि डिजिटल सेवांकडे वाटचाल केली आहे.
९ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय टपाल दिन पोस्ट विभागामार्फत साजरा केला जातो. दरम्यान, आजच्या युवापिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटींग्जचे महत्त्व भासत नाही. एकेकाळी नागरिकांसाठी पत्र म्हणजे सर्वकाही होते. गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी पत्र अनेकांच्या आयुष्याची लाइफलाइन होती. गावात पोस्टमनची आतुरतेने वाट पाहिली जायची. पोस्टमन आला की आपले पत्र आल्याची विचारणा आवर्जुन केली जायची. यामुळेच टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते.
मोबाईलच्या वेगाने पत्र मागे पडले
गेल्या १० ते १५ वर्षांत मोबाईल आणि इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. व्हॉट्सॲप, ई-मेल, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी काही सेकंदांत संपर्क साधणे शक्य झाले. त्यामुळे पत्र लिहिण्याची आणि पोस्टाने पाठविण्याची गरज आता कमी झाली. पूर्वीच्या पत्रव्यवहाराची जागा डिजिटल संवादाने घेतली आहे.
इन्फो
पोस्टाकडून आधुनिक युगात सेवांचा विस्तार
माहिती- तंत्रज्ञानाच्या युगातील आव्हान स्वीकारत टपाल विभागानेही आपल्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत. पारंपरिक पत्रव्यवहारासोबत इलेक्ट्रॉनिक मनिऑर्डर, आंतरराष्ट्रीय मनी ट्राॅन्स्फर, मनीग्राम यांसारख्या सेवांचा विस्तार केला. त्याचबरोबर बँकिंग सेवा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम, एसबी खाते, बचत बँक, आरडी, मुदतठेव, वरिष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यांसारख्या आर्थिक सेवांमुळे पोस्टाचे स्वरूप व्यापक झाले आहे.
–