ॲंकर
टुडे पान चारसाठी
NSK26H34295
जळगाव : दीपस्तंभ फाउंडेशन संचालित मनोबल प्रकल्पात रविवारी झालेल्या ‘प्रकाश पूजन’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मान्यवर.
-------
दिव्यांग, अनाथ मुलांनी घडवले सर्वसमावेशकतेचे दर्शन
--------
दीपस्तंभ मनोबलमध्ये ‘प्रकाशपूजन’; ज्ञानरूपी प्रकाशाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : येथील दीपस्तंभ फाऊंडेशन-मनोबलच्या वतीने दिवाळीनिमित्त दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर व आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांसाठी प्रकाशपूजन या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता.१) करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून सर्वसमावेशकतेचे अनोखे दर्शन घडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर व त्यांचे पती सौरीश सहाय (आयएफएस), संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीर वर्दे, ठाणे जनता नागरी सहकारी बँकेचे शरद गांगल व अंजली गांगल, प्राचार्य अनिल राव, ‘अडकित्ता’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष वाघ व संपदा वाघ, सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विलास व विदुला ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यजुर्वेंद्र महाजन यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचे आयुष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशाचे पूजन ही या उपक्रमामागील संकल्पना असल्याचे सांगितले. प्रकाशपूजन सर्व मान्यवर महिलांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून पार पडले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विलास व विदुला ठुसे, कवितांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे प्रशांत मोरे, अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारी गार्डियन संस्था तसेच डॉ. पटेल व परिवार यांचा देणगीदार म्हणून कृतज्ञता सन्मान करण्यात आला.
ट्रान्सजेंडर विद्यार्थिनीच्या ‘भरतनाट्यम’ या शास्त्रीय नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दृष्टिबाधित, कर्णबधिर व इतर दिव्यांग विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य, नाटिका आदी कलाप्रकार सादर केलेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नृत्य, भारताच्या विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक रांगोळ्या, दिव्यांची आरास व दिवाळी सजावटीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.