३-दिवाळी अंक - खानदेशातील प्राचीन वारसास्थळ - श्री क्षेत्र दक्षिणकाशी प्रकाशा

३-दिवाळी अंक - खानदेशातील प्राचीन वारसास्थळ - श्री क्षेत्र दक्षिणकाशी प्रकाशा
Published on: 
(दिवाळी अंकासाठी) फोटो : NSK26H32040 (प्रकाशा येथील ऐतिहासिक मंदिर) फोटो : NSK26H32034 (पुष्कर शास्त्री) ------------------- खानदेशातील प्राचीन वारसास्थळ --------------------------- श्री क्षेत्र दक्षिणकाशी प्रकाशा स्कंदपुराणातील तापी माहात्म्यात वर्णन केलेले आणि तापी, गोमाई व पुलिंदा नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले प्रकाशा तीर्थक्षेत्र पौराणिक श्रद्धा, पुरातत्त्वीय वारसा आणि प्राचीन मंदिरांच्या वैभवाने समृद्ध आहे. हजारो वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या या तीर्थक्षेत्राला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. - प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री, शहादा प्रकाशकर्मिदतिर्थ सर्वपाप‌प्रणाशनम् । प्रकाशत्व गता यत्रं पयोष्णंतर्गता सरितः ॥१॥ सर्वदेव मिदं क्षेत्र दुर्लभ वत्स भूतले । अशेष पाप दहनं विशेषाच्चोत्तरायणे ॥२!! स्कंद पुराणातील सहाव्या खंडात - तापी माहात्म्यात- प्रकाशा तीर्थक्षेत्राचा महिमा वर्णन करणारे अनेक अध्याय आले आहेत, पैकी ९ व्या अध्यायात प्रकाशा तीर्थक्षेत्राचे महात्म्य वरील श्‍लोकातून आले आहे. ज्यात भगवान शंकर आपला पुत्र कार्तिक स्वामींना सांगतात की, तृप्त झालेली पयोठणी (पुलींदा) नदी जिथे प्रकट झाली आहे, असे प्रकाशा नामक तीर्थक्षेत्र सर्व पापांचा नाश करते. भूतलावावरील हे पवित्र तीर्थक्षेन सर्व देवांनाही दुर्लभ असून उत्तरायणानात येथील तापी नदीत स्नान केल्यास सर्व पापांचा नाश होतो.'' प्रकाशाला अतिशय समृद्ध असा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला आहे. संपूर्ण भारतवर्षात ''प्रकाशा'' नावाचे हे एकमेव गाव आहे. अगदी पुराण काळापासूनच त्याचे नाव प्रकाशाच असल्याची वरील श्‍लोकातून पृष्टी मिळते. प्रकाशाशी संबंधित एकूण २ ताम्रपट व ९ शिलालेख उपलब्ध होतात. त्याआधारे अतिप्राचीन काळापासूनचा अखंड समृध्द वारसा लक्षात येतो. ताम्रपट इ.स. ५५० व इ.स. ८२० सालातील असून एक शिलालेख यादवकाळातील (इ.स. १२३४) व उर्वरीत सर्व मराठा काळातील महणजेच ३१७ व्या शतकातील आहेत. सर्वच शिलालेख येथील विविध मंदिरांवर आजही पाहता येतात. भारतीय पुरातत्व खात्याने इ.स.१९५५ मध्ये प्रकाशा, सावळदा, बहुरूपा, कुकरमुंडे या तापी नदीच्या तीरावर संचालक श्री.बाळकृष्ण थापर (बी. के. थापर) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनने केलीत. या उत्खननातून प्रकाशा येथे ताम्रपाषाण युगातील (इ.स.पू.२२०० ते इ.स.पू. ७००) विविध संस्कृतीचे (सावळदा, माळवा आणि जोर्वे संस्कृती) अवशेष मिळाले आहेत. ताम्रयुगातील उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय संस्कृतीचा सुंदर मिलाफ येथे घडून आला होता. तसेच ज्याप्रमाणे प्रकाशा येथे त्रिवेणी संगम आहे, (तापी, गोमाई व पुलींदा) तसेच प्रकाशा हे ठिकाण पुरातत्वाच्या दृष्टीकोनातून सांस्कृतिक संगम स्थळ देखील ठरते. या उत्खननातून व श्रीक्षेत्र प्रकाशाला जो अतिप्राचीन पौराणिक वारसा लाभला आहे तो ऐतिहासिक दृष्ट्याही अधोरेखित होतो. तापी माहात्म्यात प्रकाशातील सिद्धेश्वर व गौतमेश्वर अशा दोन प्रमुख मंदिरांचा उल्लेख मिळतो. स्वर्गलोकातील मनोरथ नावाच्या गंधर्वास प्रकाशा येथे दुर्वास ऋषींच्या आशीर्वादाने श्री. सिद्धेश्वराच्या दर्शनाने व तापीस्नानाने मुक्ती मिळाल्याची कथा यात येते. आजही हे सिद्धेश्वराचे मंदिर प्रकाशात असून भाविक अत्यंत श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. श्री. गौतम ऋषींचा एकदा श्रीक्षेत्र प्रकाशा येथे निवास होता. त्यावेळी आलेल्या सिंहस्थ पर्वणी उत्सवाला ते त्र्यंबकेश्‍वरी जाऊ शकले नाहीत. त्यांच्या हातातील अक्षमाला ज्याठिकाणी पडली तिथे श्री महादेवाचे मंदिर बांधून त्यांनी सिंहस्थ पर्वणी उत्सव साजरा केला. त्यामुळे त्यांच्या नावावरून या मंदिरास श्री. गौतमेश्‍वर असे नाव मिळाले. परंपरेने आजही येथे सिंहस्थपर्वणी उत्सव साजरा केला जातो, अशी आख्यायिका तापी माहात्म्यात आली आहे. त्यातील यासंदर्भातील उल्लेख असा... श्री. तापीचे वैभव ऐकुन, गौतम महामुनी अक्षमाला पडली करीहुनी ते रूद्राक्षमालिका तिर्थ झाले श्री. पुष्पदंतेश्‍वराचे एक प्राचिन मंदिर प्रकाशाच्या वैभवात भर घालत आहे. पुष्पदंतेश्‍वराचे मंदिर काशीतही नाही. याबद्दलचा श्‍लोक पुढीलप्रमाणे ... प्रकाशा सूर्यसंकाशा बाराणस्या विशेषतः । नत्र माहेश्वरं देवे पुष्पदंत यवाधिकम् ।। प्रकाशा सूर्यसंकाशा असा महिमा लाभलेले प्रकाशा वाराणसीहून अधिक त्याचे मोल आहे. कारण शिवमहिम्न स्तोत्रकर्ते इंद्राच्या दरबारातील गंधर्व श्री. पुष्पदंतेस्वराचे येथे देऊळ आहे. आजही श्री शंकरास अभिषेक करताना रुद्राबरोबरच श्री शिवमहिम्न स्तोत्राचा पाठ केला जातो. ज्याची रचना पुष्पदंतेश्वराने केली होती व त्यामुळे त्यालाही भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होऊन गळून पडलेल्या सर्व सिध्दी पुन्हा प्राप्त झाल्या होत्या. स्वतः पुष्पदंत याविषयी म्हणतो.... सगुरु निज महिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात् । स्तवन मिद कार्षीद दिव्य दिव्य महिम्नः त्रिवेणी संगमावर वसलेले एक प्राचीन मंदिर म्हणजे श्री संगमेश्वर मंदिर होय. या मंदिरासमोर संगमाचा भव्य घाट असून दोन वर्षापासून येथे रोज दर रविवारी तापी मातेची आरती सुरु झालीआहे. अनेक दगडी खांबावर आधारीत सभामंडप असलेल्या या मंदिराची निर्मिती शके १६६७ (इ.स. १७४५) ला कदमबांडे घराण्याने केल्याचे त्यावरील शिलालेखात कोरलेले आहे. श्री केदारेश्वर अशी ज्या भागाला मंदिराच्या नावावरून वेगळी ओळख मिळालेली आहे, असे या भागातील अनेक मंदिरो-पैकी एक प्रमुख मंदिर म्हणजे श्री केदारेश्वर मंदिर. श्री. केदारेश्‍वर व श्री. काशी विश्‍वेश्‍वर ही दोन मंदिरे अगदी एकमेकांना लागून असल्याने यांचा सभामंडप हा एकत्रित आहे. मंदिर उंच चबुतऱ्यावर बांधलेले असून समोर ८५ फूट उंचीची आतून वर जाता येणारी दीपमाळ ही या मंदिराचे आगळेवेगळे वैशिष्टे ठरते. श्री. केदारेश्‍वर या नावाने महाराष्ट्रात मात्र हरिश्‍चंद्र गडावरील एक लेणी मंदिर मिळते. जे मंदिर कलचुरी काळातील आहे. प्रकाशा हा भागदेखील कलचुरीच्या राज्यात मोडत होता. तेव्हा या मंदिराचा ऐतिहासिक संदर्भ इतका प्राचीन काळापर्यंत पोहचतो. (इस. ५५० ते ६२०) मात्र मंदिराची बांधकाम शैली मराठा काळातील वाटते. तसेच शेजारील काशी विश्‍वेश्‍वराचे मंदिर देखील मराठा काळातीलच आहे. मात्र श्री. केदारेश्‍वर हे प्रकाशातील सर्वात प्राचीन शिवमंदिर आहे. त्या मंदिरातच श्री. तापीमातेचे मंदिर असून शेजारी डाव्या बाजूस श्री. पितृश्‍वराचे मंदिर आहे. येथे पितरांची पुजा व उत्तरपूजा केली जाते. या मंदिरावर शिलालेख असून कदमबांडे घराण्याने निर्मिती केल्याचा उल्लेख आहे. काशीचा ओटा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराची एक पारंपरिक आख्यायिका आहे. हे मंदिर बैठा ओटा चबुतरा स्वरूपात असूनही त्यात महादेवाचे लिंग आहे. आख्यायिकेनुसार, जेव्हा सहा महिन्याचा दिवस व सहा महिन्याची रात्र होते तेव्हा एका रात्रीतून शंकराची १०८ मंदिरे उभारायची होती. काशी व प्रकाशा येथे मंदिरे उभारण्यास सुरुवात झाली. मात्र १०८ वे मंदिर उभारायच्या आतच उजाडले. प्रकाश पडला. म्हणून या गावाचे नाव प्रकाशा पडले. काशीशी स्पर्धा करणारे प्रतिकाशी म्हणून प्रकाशा असाही एक अर्थ आहे. व दक्षिणेतील काशी म्हणून दक्षिण काशी अशी विविध नावे प्राप्त झाली आहेत. आजही प्रकाशात शंभराहून अधिक केवळ शंकराची मंदिरे आहेत. प्रकाशात इतरही देवांची विविध मंदिरे आहेत. त्यात श्रीराम, श्री मारूती, श्री. बालाजी, श्री. कार्तिक स्वामी, श्री. विठ्ठल, श्री. गणपती, श्री. मणसापुरी, श्री. दत्त, श्री. तोताराम महाराज, श्री. याहामोगी इत्यादी. मात्र आज प्रकाशात सुर्यदेवाचे मंदिर नाही. पूर्वी मात्र प्रकाशात सुर्यदेवाचे मंदिर होते. ते नष्ट झाले आहे. प्रकाशातील या सूर्यमंदिरावरील शिलालेख इ.स.१९५५ ला प्राप्त झाला. तो संस्कृतमध्ये असून त्याचे वाचन दिल्लीतील संस्कृत अभ्यासकांनी केले असून ३६ व्या शिलालेख खंडात तो प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या वाचनातून जी माहिती समोर येते. ती अशी - हा शिलालेख २ फुटी असून तो सूर्य देवाच्या मंदिरावर बसविलेला होता. इ. स. १२३३-३४ म्हणजेच यादवकाळात हरिहर भट आणि महादेव भट या प्रकाशातील अत्रे गोत्रातील दोन ब्राह्मण बंधूंनी त्याची निर्मिती केली होती. त्या वेळेस देवगिरीत यादव राजा सिंघण महाराज द्वितीय यांची सत्ता होती व त्यांचे नावही शिलालेखात कोरले आहे. काही वर्षांपूर्वी प्रकाशातील सूर्य देवाची सुमारे दोन फूट उंचीची संगमरवरी मूर्ती धुळ्याच्या इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संग्रहालयात नेण्यात आली. कदाचित ती याच मंदिरातील असावी, असा निष्कर्ष काढता येतो. शिलालेखात प्रकाशाविषयी व मंदिराच्या सुरेख निर्मितीविषयी फार सुंदर उल्लेख आलेला आहे तो असा... कृतं रम्य विक्रमांक सुरालयम येना लंकार भूतेन प्रकाशा प्रकाशते याचा अर्थ असा की, अतिशय रम्य अशा विक्रमांक (श्री. सूर्य) मंदिराची निर्मिती केलेली असून एखाद्या स्त्रीने अलंकार परिधान केल्यावर ती जशी शोभून दिसते, तसेच प्रकाशाच्या या भूमीने या मंदिररूपी अलंकार परिधान केल्याने प्रकाशा तीर्थक्षेत्र प्रकाशमान झालेले आहे. चारही धाम यात्रा करून जोपर्यंत प्रकाशा दर्शन घेत नाही, तोपर्यंत ही तीर्थयात्रा संपूर्ण होत नाही अशी मान्यता असल्याने व एवढा समृद्ध प्राचीन वारसा असल्याने विविध राज्यातून येथे भाविकांची, तीर्थयात्रींची तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या श्रध्दावंतांची नेहमीच गर्दी असते. (लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.