NSK26H34974
आमलाड (ता. तळोदा) : प्री- फॅब्रिकेटेड अंगणवाडीचे उद्घाटन करताना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे. शेजारी आमदार राजेश पाडवी आदी.
NSK26H34975
नंदुरबार : ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनतर्फे उभारलेल्या ईपीडीएस युनिटची माहिती घेताना मंत्री आदिती तटकरे. शेजारी आमदार राजेश पाडवी, आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे आदी.
---
‘प्री-फॅब्रिकेटेड’ अंगणवाड्यांची माहिती केंद्र शासनाच्या अहवालात समाविष्ट होणार
---
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १३ : जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या नवनिर्मित इमारती राज्यात सर्वोत्कृष्ट आहेत. या अंगणवाड्यांची माहिती केंद्र शासनाच्या अहवालात समाविष्ट होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
तळोदा तालुक्यातील आमलाड, तळवे, मोरवड, उमरी, मोड येथील अंगणवाड्यांच्या प्री-फॅब्रिकेटेड इमारतींचे लोकार्पण मंत्री तटकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषद व महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने फिडींग इंडियाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी इमारती बांधल्या आहेत. आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, सहायक जिल्हाधिकारी लघीमा तिवारी, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले, तहसीलदार दीपक धीवरे, फीडिंग इंडियाचे वृषभ चोपडा, मोरवडच्या सरपंच अक्षता वळवी आदी उपस्थित होते.
फीडिंग इंडिया संस्थेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्वयंपाकघराच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधा आणि कुपोषण निर्मूलनात नंदुरबार जिल्ह्याचे काम देशपातळीवर उत्कृष्ट आहे, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. आमदार राजेश पाडवी म्हणाले, की झोमॅटोच्या फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत उभारलेल्या आधुनिक अंगणवाड्यांचा विस्तार जिल्हाभर होणार आहे.
डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या, की फीडिंग इंडिया उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या स्वयंपाकघरातून रोज सुमारे पाच हजार ८०० बालकांना दोन वेळेचा आहार दिला जात आहे. डिसेंबरपासून जवळपास सुमारे २५ हजार बालकांना भोजन देण्याचे नियोजन आहे. नमन गोयल यांनी फिल्डिंग इंडियाच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
मंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री मातृत्व योजना, लेक लाडकी योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले. बेबी केअर किट देण्यात आले. एनर्जी प्रोटीन डेन्स सप्लिमेंट ईपीडीएस मॅन्युफॅक्चरिंग युनिट, फीडिंग इंडिया झोमॅटोच्या सेंट्रल किचन, ईपीडीएसनिर्मिती युनिटला मंत्री तटकरे यांनी भेट दिली.