बोलीभाषांचा वारसा लिखित स्वरूपात जतन करण्याची गरज

बोलीभाषांचा वारसा लिखित स्वरूपात जतन करण्याची गरज
Published on: 
फोटो : NSK26H34495 नंदुरबार : नांदी संमेलनाच्या उद्‌घाटनाप्रसंगी उपस्थित प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, डॉ. सुहास नटावदकर, प्रदीप निफाडकर, शशिकांत घासकडबी, श्रीजी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी. ------------ बोलीभाषांचा वारसा लिखित स्वरूपात जतन करण्याची गरज पद्‌मश्री चैत्राम पवार यांचे नांदी साहित्य संमेलनात प्रतिपादन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ४ : आदिवासी समाजातील लोकगीते, मौखिक परंपरा, डोंगरदेवाची पूजा, पर्यावरणविषयक ज्ञान आणि बोलीभाषांचे संवर्धन करून हा वारसा लिखित स्वरूपात जतन करावा. पुढील पिढ्यांसाठी आपले अस्तित्व आणि अस्मितेसाठी लोकसंस्कृतीचे दस्तऐवजीकरण करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन पद्मश्री चैत्राम पवार यांनी केले. जिल्हा नांदी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित होत्या. मसापचे विभागीय कार्यवाह संजीव गिरासे, स्वागताध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, मसापचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, साहित्य भारतीचे कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी, श्रीजी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, जनजाती समाजाचा निसर्गाशी जोडलेला सांस्कृतिक वारसा आणि अनेक परंपरा आजही मौखिक स्वरूपात आहेत. पारंपरिक ज्ञानाचा ठेवा दस्ताऐवजीकरण करून जतन केला पाहिजे. आदिवासी समाजातील क्रांतिकारक आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना पुढे आणण्यासाठी साहित्यिकांनी चिंतन करावे. प्रदीप निफाडकर म्हणाले, नंदुरबारमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची चळवळ अधिक व्यापक झाली पाहिजे. साहित्य चळवळ रुजविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित म्हणाल्या, मौखिक परंपरा ही लोकसाहित्याची महत्त्वाची शक्ती आहे. लोकविज्ञान, लोकज्योतिष आणि लोकजीवनातील विविध पैलूंचा अभ्यास होणे आवश्यक आहे. वि. का. राजवाडे यांच्यासह काही साहित्यिकांनी लोकसाहित्याचा आधार घेऊन इतिहासलेखन केले. नजूबाई गावित या जगातील पहिल्या आदिवासी महिला कादंबरीकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या आत्मचरित्रातील अनुभवांमधून आदिवासी जीवन, निसर्ग आणि सांस्कृतिक वास्तवाचे दर्शन घडते. स्वागताध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्य भारतीचे कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी यांनी प्रास्ताविक केले. अभिजित खेडकर यांनी पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन केले. श्रीजी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी यांनी आभार मानले. दीपक कुळकर्णी, सुलभा महिरे, कल्याणी डांगे, तारकेश्वर पटेल, अजित लांडगे, संतोष पाटील, गौरीशंकर धुमाळ, सविता पटेल, डॉ. पुष्कर शास्त्री, राहुल खेडकर, पंकज पाठक, विजय पवार, श्रीराम दाऊतखाने, सुनील भदाणे, निंबाजीराव बागूल, क्षमा वसईकर, प्रा. डॉ. माधव कदम, डॉ. गिरीश पवार, प्रशांत पवार, डॉ. विवेक वैद्य व रणजित राजपूत आदींनी परिश्रम घेतले. निंबाजीराव बागूल म्हणाले, अहिराणी भाषा नष्ट़ व्हायला नको. या भाषेतील कवितेमध्ये यमक नसले तरी गोडवा असतो. ‘लळीत’वर मुरलीधर पाटील यांनी परंपरेला स्पर्श केला. अविनाश कोकणी यांनी डोंगऱ्यादेवावर व्याख्यान देत नृत्यही केले. श्रावण चव्हाण व करणसिंग चव्हाण यांनी ‘बंजारा समाजाची एक वेषभूषा- एक भाषा’ यावर विवेचन केले. विजय पाटील, क्षमा वसईकर यांनी सूत्रसंचालन केले. होळतर्फे अनुसुचित जाती नवबौद्ध शाळेच्या विद्यार्थिनिंनी नृत्य केले. ----------- बोलीभाषा संवर्धनावर चर्चा प्रा. डॉ. माधव कदम यांनी अहिराणी साहित्यावर विवेचन केले. बोली भाषा जगली तरच माणूस जगेल, असे सांगितले. प्रा. सविता पटेल म्हणाल्या, खानदेशात गुर्जर समाज मोठ्या संख्येत राहतो. गुजरी बोलीभाषेतून लोकसाहित्य निर्माण व्हावे. प्रा. टी. एन. पाडवी यांनी आदिवासींच्या विविध भाषेवर प्रकाशझोत टाकला. आदिवासी भाषीक परंपरा, लोकगीतांचे संकलन करणे गरजेचे आहे. भिली, कोकणी, मावची भाषेचे संकलन ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वापर करुन केला जात आहे. असे त्यांनी सांगितले. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.