राष्ट्रपतींच्या हेलिकॅप्टर लँडिंगसाठी चाचपणी
महाराष्ट्र पोलिस अकादमीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या ३१ ऑक्टोबरला होत आहे. यासाठी राष्ट्रपती नवी दिल्ली येथून वायुसेनेच्या विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर उतरतील. त्यानंतर विमानतळावरून तीन हेलिकॅप्टरमधून त्या नाशिकमध्ये येणार आहेत. शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) त्यांच्या तिन्ही हेलिकॅप्टर लँडिंगसाठीची अनेक जागांची चाचपणी करण्यात येत असली तरी त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अकादमीत राष्ट्रपती मुक्कामी असतील.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबरला दुपारी रामतीर्थांवर होणार आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा उपस्थित राहतील. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती नवी दिल्ली येथून वायुसेनेच्या विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर उतरतील. विमानतळावरूनच त्या वायुसेनेच्या हेलिकॅप्टरने नाशिकमध्ये दाखल होतील.
शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) राष्ट्रपतींसोबत वायुसेनेचे तीन हेलिकॅप्टर असतात. त्यामुळे एकाच मैदानावर तीन हेलिकॅप्टरच्या लँडिंगच्या अनुषंगाने जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून शहरातील अनेक मैदानांची पाहणी करण्यात आली. शहर पोलिस आयुक्तालयाच्या कवायत मैदानासह केटीएचएम महाविद्यालय, भोसला मिलिटरी स्कूल, छत्रपती संभाजीनगर रोडवरील बिडी कामगार येथील मैदानाचीही पाहणी करून चाचपणी करण्यात आली. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीवर तीनही हेलिकॅप्टर लँडिंगची चाचपणी करण्यात आली. तसेच ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती मुर्मू दुपारी ध्वजारोहणानंतर त्र्यंबकेश्वरला जाण्याची शक्यता आहे. तसेच सायंकाळी पुन्हा गोदावरी आरतीसाठी रामतीर्थावर येणार आहेत. यामुळे राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्येच हेलिकॅप्टर लँडिंगवरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच याच ठिकाणी राष्ट्रपतींचा मुक्काम असल्याने सर्वांगाने ते सोयीस्कर ठरणार असल्याने हे ठिकाण निश्चित होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने कडेकोट पोलिस बंदोबस्त व सुरक्षिततेचाही आढावा घेतला जात आहे.