पान-१-३
-----------
कारागृह रक्षकाकडूनच ‘चरस’ची तस्करी
गुप्तांगाखाली चिकटवून तुरुंगात विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात अमली पदार्थ विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा नेहमीच असते. परंतु कारागृहातील रक्षकच या रॅकेटमध्ये सामील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रवींद्र एकनाथ पाटील (३५) या कारागृह रक्षकाने गुप्तांगाखाली चरस चिकटवून कारागृहात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र कारागृह सुरक्षा रक्षकांच्या कडक तपासणीमुळे सुरक्षा रक्षकाचा पर्दाफाश झाला. कारागृह महानिरीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारागृहात झडतीसत्र राबविण्याचे आदेश दिले असून या कृत्यात सहभागी असणाऱ्या कारागृह अधिकारी, रक्षकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ४) सकाळी पावणे बाराच्या सुमारास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या झडती कक्षात नेहमीप्रमाणे कारागृहात नियुक्तीवर असलेल्या रक्षकांची कसून झडती घेतली जात होती. त्यावेळी संशयित रवींद्र पाटील हा शासकीय नोकर असताना आणि कर्तव्यावर हजर असताना, त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित असलेला चरस हा अंमली पदार्थ कारागृहातील बंदीवानांना विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे निदर्शनास आले. पाटीलने चरस गुप्तांगाखाली चिकट टेपने चिटकवले होते. परंतु कारागृह रक्षक नारायण जयसिंग राजपूत व सहकाऱ्यांकडून सुरू असलेल्या अंगझडती दरम्यान पाटील रंगेहाथ पकडला गेला. नारायण राजपूत यांच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ॲक्ट) चे कलम २०(ब), २९, ८(क) सह तुरुंग अधिनियम १८९४ चे कलम ५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक भुवनेश्वर घनदाट तपास करीत आहेत.
१६-१
तब्बल ३३ ग्रॅम चरस
झडतीवेळी संशयित कारागृह रक्षक पाटील त्याच्याकडून ३३ ग्रॅम वजनाचा चरस हा प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त करण्यात आला. कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी हे प्रकरण गांभीर्याने दखल घेतले असून, मध्यवर्ती कारागृहाची कसून झाडाझडती घेण्याचे व या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत.
---------------