Latest Marathi News | Project Durga : गुंतागुंत वाढलेली असताना 'ती'ने केली कर्करोगावर यशस्‍वी मात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breast Cancer Survivor News

Project Durga : गुंतागुंत वाढलेली असताना 'ती'ने केली कर्करोगावर यशस्‍वी मात

सामान्‍य जीवन जगत असताना वेदना होऊ लागल्‍याने स्‍तनातील गाठीकडे लक्ष गेले. वैद्यकीय तपासण्या केल्‍या असता, स्‍तनाच्‍या कर्करोगाचे निदान झाले. जेव्‍हा निदान झाले तेव्‍हा तिसऱ्या स्‍तरावर कर्करोग पोचलेला होता. अशा परिस्थितीतही हि‍मतीने सामना करताना वैशाली पाटील यांनी कर्करोगाचा पराभव केला. अर्थात या सर्व प्रसंगात नातेवाईक, मैत्रिणींची खंबीर साथ लाभल्‍याचे त्‍या सांगतात.

गृहिणी असलेल्‍या सौ. पाटील यांना सहा वर्षांपूर्वी २०१६ मध्ये त्रास होऊ लागला. वेदना होत असल्‍याने याबाबत तपासणी केली असता, स्‍तनात गाठ असल्‍याचे लक्षात आले. यानंतर तातडीने उत्तरीय तपासण्या करून घेतल्‍या. आठ दिवसांनी अहवाल प्राप्त झाल्यावर कर्करोगाचे निदान झाले. कर्करोग तिसऱ्या स्‍तरावर पोचलेला होता. अशात तातडीने व तीव्र स्वरूपाचा उपचार घेण्याची आवश्‍यकता डॉक्‍टरांनी व्‍यक्‍त केली. (Project Durga Vaishali patil successfully overcome breast cancer despite complications Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Bogus Medical Certificate : 5 बनावट प्रमाणपत्रांच्या सत्यता पडताळणीत तथ्य

वेळ वाया न जाऊ देता, कुटुंबीयांकडून सौ. पाटील यांच्‍यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. उपचारासाठी टाटा हॉस्‍पिटल गाठले. तेथे मुक्‍कामी राहताना त्‍यांनी केमोथेरपी, रेडिएशनसह शस्त्रक्रिया पार पाडली. आजारपणात प्रवास करताना व कुटुंबीयांचे हाल पाहताना दुःखद भावना मनात यायची.

परंतु आपण आपल्‍या कुटुंबातील सदस्‍यांकरिता कर्करोगाचा पराभव करायचा व त्‍यांनी घेतलेल्‍या कष्टांची जाणीव ठेवताना आगामी आयुष्य सुखकर करण्यासाठी त्‍यांची साथ द्यायची असा दृढ निश्‍चय केल्‍याचे सौ. पाटील सांगतात. इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर कर्करोगावर मात करता आली. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता महिलांनी ठराविक कालावधीनंतर तपासण्या करत राहायला हव्‍या व लक्षणे आढळल्‍यावर दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करून घ्यावा. जेवढे लवकर निदान झाले, तेवढे उपचारातील त्रास कमी करता येऊ शकतो, असे त्‍या आवर्जून सांगतात.

हेही वाचा: Damged Road : रस्त्यांच्या दुरवस्थेला ‘गुणवत्ता’ विभाग जबाबदार