पान-२
-----------
३०-२
पवित्र ध्वजाच्या सुरक्षेसाठी
कायमस्वरूपी रक्षक नेमा
पुरोहित संघाची प्रशासनाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१ : नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वकाळाला प्रारंभ झाला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता.३१) धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या १४ रत्नांचे प्रतिकात्मक महत्त्व असलेल्या पवित्र ध्वजस्तंभाच्या संरक्षणासाठी कुंभमेळा संपेपर्यंत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी पुरोहित संघाने प्रशासनाकडे केली आहे.
सुबक रचना आणि धार्मिक प्रतीकांनी सजलेला हा ध्वजस्तंभ भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र ठरणार आहे. ध्वजारोहणानंतर या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा असल्याने ध्वजस्तंभाच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच या पवित्र स्थळाचे पावित्र्य जपले जावे, यासाठी प्रशासनाने तातडीने सुरक्षा व्यवस्था करावी, अशी भूमिका पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वकाळात लाखो भाविक गोदावरीत स्नानासाठी दाखल होणार आहेत. २०२७ मध्ये २ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ११ सप्टेंबर या दिवशी मुख्य अमृतस्नान पर्वण्या नियोजित आहेत. याशिवाय विविध ४५ लघुपर्वण्यांमध्येही भाविकांना स्नानाचा लाभ घेता येणार आहे. या दीर्घ धार्मिक पर्वकाळात ध्वजस्तंभाचे संरक्षण, परिसरातील शिस्त आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पुरोहित संघाने व्यक्त केली आहे.
-----------------