पुणे विद्यापीठाने रात्रीतून बदलले परीक्षा वेळापत्रक

पुणे विद्यापीठाने रात्रीतून बदलले परीक्षा वेळापत्रक
Published on: 
पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता परीक्षेच्या वेळापत्रकात गोंधळ --- ऐनवेळी वेळेत बदल, प्रथम वर्षाची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांना मनस्‍ताप, नियोजनावर प्रश्नचिन्ह सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद (जर्नालिझम ॲन्ड मास कम्युनिकेशन) विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या सत्र परीक्षांच्या नियोजनातील विसंगती समोर आली आहे. सुरुवातीला नियमित आणि बॅकलॉग परीक्षांचे पेपर एकाच दिवशी, एकाच वेळी ठेवण्यात आले. त्यानंतर वेळापत्रकात रात्रीतून बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, द्वितीय वर्षाची परीक्षा १७ नोव्हेंबरऐवजी २५ नोव्हेंबरपासून घेण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वी अचानक जाहीर करण्यात आला; तर मंगळवार (ता. १७)पासून सुरू होणाऱ्या प्रथम वर्षाच्या परीक्षेची वेळ दुपारी दोन ते सायंकाळी पाचऐवजी सकाळी दहा ते दुपारी एक अशी बदलण्यात आली. सुधारित वेळापत्रक परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी सायंकाळी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर मंगळवारी नमूद असलेला प्रथम वर्षाचा पेपरही ऐनवेळी रद्द करून २५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांच्या परीक्षा विभागांना विश्वासात न घेता केलेल्या या बदलांमुळे संभ्रम अधिक वाढला. पत्रकारिता अभ्यासक्रम असलेल्या काही महाविद्यालयांनाही परीक्षेच्या वेळेतील बदलाची पूर्वकल्पना नव्हती. परिणामी, जुन्या वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागला. सुट्या २६ पर्यंत, मग परीक्षा आधीच कशा? विद्यापीठाने दिवाळीच्या सुट्या २६ नोव्हेंबरपर्यंत जाहीर केल्या आहेत. या कालावधीत परीक्षा किंवा अन्य शैक्षणिक कामकाज करू नये, अशी भूमिका विद्यापीठातील कर्मचारी आणि प्राध्यापकांनी वरिष्ठांकडे मांडल्याचे समजते. असे असताना सुट्या संपण्यापूर्वीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करून १७ नोव्हेंबरपासून परीक्षा घेण्याचे नियोजन कसे करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परीक्षा नियोजनातील या विसंगतीबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची मागणीही होते. कोट पुणे विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षांच्या वेळापत्रकातील गोंधळामुळे सर्वच विद्यार्थ्यांची धावपळ झाली. परीक्षा केंद्रावर दोन्ही वर्षांचे विद्यार्थी एकत्र आले. आसन क्रमांकांची व्यवस्था नव्हती. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यापीठाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला. - अभिमन्यू पाटील, प्रथम वर्ष जर्नालिझम परीक्षार्थी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.