Nashik : ‘त्या’ ठेकेदाराविरोधात कळवण पोलिसांना पत्र

PWD News
PWD Newsesakal

कळवण (जि. नाशिक) : शहरात तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता कामामुळे वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेकदा अपघात झाले असून, दोन दिवसांपूर्वीही दोघांना प्राण गमवावे लागले. कोणतीही अडचण नसताना संबंधित ठेकेदाराकडून काम करण्यास उशीर होत असून, आतापर्यंत त्याला दोनदा मुदतवाढ देऊनही काम अपूर्ण आहे. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नितीन पवार यांनी पालकमंत्री दादा भुसे यांचे लक्ष वेधत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पालकमंत्री भुसे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एचएमपी बिल्डकॉन प्रा. लि. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली असून, कळवण पोलिस ठाण्याला पत्र देऊन तपासात दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करण्याची विनंती केली आहे. (PWD action started to blacklist contractor of HMP Buildcon Pvt Ltd Nashik News)

केंद्र सरकारच्या निधीतून कळवण शहरात हायब्रीड अम्युनिटी मॉडेल (हॅम) अंतर्गत तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराला तीन वर्षांपूर्वी कार्यारंभ आदेश दिले होते. त्यानंतर कोरोनाचे कारण सांगत संबंधिताने काम पूर्ण करण्यास उशीर केला. एकच काम तीन वर्षांपासून सुरू असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चालकांना वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यातच अनेकदा अपघात झाले आहेत. यामुळे या रस्ता कामाविरोधात नागरिकांच्या मनात असंतोषाची भावना आहे. अनेक वेळा याबाबत बैठका झाल्या.

दोन वेळा आंदोलने झाली. दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यामुळे नागरिकांनी निषेध करीत रस्ता रोको आंदोलन केले. आमदार नितीन पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची व रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. आमदार पवारांची आक्रमक भूमिका आणि रस्त्यांची गंभीर परिस्थितीमुळे पालकमंत्री भुसे यांनी कळवण तालुका हद्दीतील कामे तत्काळ पूर्ण करण्याची सूचना अधीक्षक अभियंता सोनवणे यांना केली.

पालकमंत्री भुसे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सोनवणे यांना धारेवर धरले. श्री. सोनवणे यांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले असल्याचे सांगून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे, असे उत्तर दिले. यामुळे पालकमंत्र्यांचाही थोडावेळ संभ्रम झाला. या कामास तीन वर्षे का लागलीत, याबाबत पालकमंत्र्यांनी प्रश्‍न विचारल्यानंतर अधीक्षक अभियंत्यांनी केंद्र सरकारच्या कोरोना काळातील मार्गदर्शक सूचनांमुळे कामबंद होते, असे उत्तर दिले.

PWD News
Sakal Exclusive : शालेय पोषण आहारचा भार प्रभारीवर!

त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अशा कोणत्याही सूचना नव्हत्या. उलट केंद्राच्या भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाने रस्ते बांधकामाचे विक्रम याच काळात केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. अधिकारी चुकीची माहिती देत असल्यामुळे कळवणला माझ्याविरोधात आंदोलन केले जात असल्याचा आरोप करीत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या मुद्याला कळवणमधील स्थानिक राजकारणाचे संदर्भ असल्याचे लक्षात येताच पालकमंत्र्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देत चर्चेला पूर्णविराम दिला.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने एचएमपी बिल्डकॉन प्रा. लि. या ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. कळवण पोलिसांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र प्राप्त झाले असून, याबाबत पोलिसांनी जाबजबाब नोंदविले आहेत.

PWD News
Nashik : मृतदेहावर मुंग्या फिरत असल्याची Video Viral!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com