अवघ्या नऊ तासात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
तरूणीच्या विनयभंग प्रकरणात धुळे पोलिसांकडून तत्परता
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. ७ : ठाण्याहून भोपाळला जाणाऱ्या एका खासगी लक्झरी बसमधील तरुणीच्या (वय २५) विनयभंगप्रकरणी येथील पोलिसांनी संशयित लक्झरीच्या सहचालकाला अटक करून अवघ्या नऊ तासात परिपूर्ण चार्जशीट तयार करून धुळे न्यायालयात दाखल केले. ही घटना शुक्रवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास घडली होती.
मुंबई येथे खासगी कंपनीत कार्यरत असलेली एक तरुणी आणि तिची लहान बहीण दिवाळीनिमित्त भोपाळ जाण्यासाठी वर्मा ट्रॅव्हल्स (एमपी ०४ वाय क्यू ५५३३) या खासगी बसमध्ये गुरुवारी (ता. ५) सायंकाळी ठाणे येथून बसले. दरम्यान, प्रवाशांच्या दोन्ही बाजूच्या सीटच्या मधल्या लॉबीत येऊन झोपलेल्या बसचा सहचालक जावेद खान गुलाब खान मन्सुरी (वय ४१, रा. ग्यारसपूर, जि. विदिशा, मध्य प्रदेश) याने गाढ झोपलेल्या फिर्यादी तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने तत्काळ ११२ या पोलिस आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. पोलिसांनी बस टोलनाक्याजवळ अडवून संशयिताला अटक केली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात जावेद खान मन्सुरी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांनी प्रभारी अधिकारी तुषार देवरे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार तत्काळ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सबळ पुरावे प्राप्त करून अवघ्या नऊ तासात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे यांच्या न्यायालयात संशयिताविरूद्ध दोषारोप पत्र दाखल केले.
पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तुषार देवरे, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, पोलिस अंमलदार तुषार मोरे व रोहन वाघ यांनी ही कामगिरी केली.
--------
नागरीकांनी तक्रारी कराव्यात
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव तत्पर असून, प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी न घाबरता तत्काळ डायल- ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.