जिल्ह्यात रब्बी हंगामाचे नियोजन पूर्ण
सरासरी उत्पादनात १९ टक्के घट होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. १३ : धुळे जिल्ह्यात पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. विहिरी, नद्या- नाले, बंधारे कोरडे पडले असून, लघु प्रकल्पात ५० ते ५५, तर मध्यम प्रकल्पात ५५ ते ६० टक्के पाणी साठा आहे. या पार्श्वभूमीवर काही पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. या सर्वांमधून उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून रब्बी हंगामासाठी उपयोगात आणले जाईल. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदा रब्बी पेरणीक्षेत्रात २६.४ टक्के घट होणार असून, सरासरी उत्पादनात १९ टक्के घट येईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे खरीप पाठोपाठ रब्बीकडूनही शेतकऱ्यांना फारशा अपेक्षा नाहीत.
जिल्ह्यात गेल्या वर्षी रब्बीचे पेरणी क्षेत्र एक लाख नऊ हजार तीनशे ३९ हेक्टर होते. यंदा त्यात घट होऊन सुमारे ८० हजार ४५० हेक्टर क्षेत्रात पेरणी होईल. मात्र, तब्बल २९ हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात घट होणार आहे. रब्बी हंगामातील गेल्या पाच वर्षातील सरासरी उत्पादकता १२१५ किलो प्रतिहेक्टर होते. यंदा हे प्रमाण ९८४ किलो प्रतिहेक्टर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात सरासरी उत्पादनात १९ टक्के घट येण्याची शक्यता आहे. रब्बीत ७८ हजार ६३१ टन उत्पादन येण्याची शक्यता आहे.