रब्बी हंगामाचे क्षेत्र ४० टक्क्यांनी घटणार
(उपशीर्षक)
जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांसमोर पेरणीचे संकट; विहिरी, कूपनलिकांच्या पाण्यावर भिस्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ ः यंदा पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावली. नंतर मोठा खंड दिल्याने खरीप पिकांना फटका बसला. आता त्याचा परिणाम रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रब्बीची पेरणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रब्बीचे क्षेत्र सुमारे ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजातून व्यक्त होत आहे.
रब्बी पिकांसाठी खरीप संपल्यानंतर जमिनीत साठलेला ओलावा महत्त्वाचा असतो. यंदा पावसाच्या मोठ्या खंडामुळे अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे विहीर, कूपनलिका किंवा सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून उपलब्ध पाण्यानुसार क्षेत्र निश्चित केले जात आहे. मागील वर्षी जिल्ह्यात २.८० लाख हेक्टरवर रब्बीची पेरणीचा अंदाज होता. तुलनेत सुमारे ३.६९ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. यंदा पावसाची स्थिती वेगळी आहे.
गव्हाचे क्षेत्र २० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता
गव्हासाठी पेरणीवेळी जमिनीत चांगला ओलावा असणे आवश्यक असते. यंदा हीच परिस्थिती अनुकूल नसल्याने मागील वर्षाच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र सुमारे २० हजार हेक्टरने कमी होण्याचा अंदाज आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडून गव्हाची लागवड केली जाईल.
हरभऱ्याचे क्षेत्र ८० ते ९० हजार हेक्टरवर?
रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या हरभऱ्यालाही यंदा पावसाच्या खंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील वर्षी रब्बी हंगामात मक्याचे क्षेत्र मोठे होते. यंदा मक्याचे क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टरने कमी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ८० ते ९० हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. जमिनीत पुरेसा ओलावा राहिल्यास हरभऱ्याचे क्षेत्र काही प्रमाणात वाढू शकते. मात्र, पावसाने आणखी पाठ फिरविल्यास हे क्षेत्रही घटण्याची शक्यता आहे.
एका पावसाने रब्बीचे चित्र बदलेल
यंदाच्या रब्बी हंगामाचे चित्र सध्या पावसावर अवलंबून आहे. सप्टेंबर पूर्ण कोरडा गेला. ऑक्टोबरचा पहिला आठवडा कोरडाच गेला. यामुळे सध्याचे चित्र रब्बीसाठी पूरक नाही. मात्र, पुढील काही दिवसांत पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा वाढून रब्बीच्या पेरणीला काही प्रमाणात चालना मिळू शकते. मात्र, पावसाचा खंड कायम राहिल्यास कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजापेक्षाही रब्बीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.
चौकट
मागील वर्षीची रब्बी हंगाम लागवड
रब्बी ज्वारी.......५० हजार हेक्टर
गहू............... ७१ हजार १२६ हेक्टर
मका............... १ लाख २८ हजार ५१४ हेक्टर
हरभरा............. १ लाख ४२८ हेक्टर