माहेजी रेल्वे स्थानकावर ‘रेल जनसंवाद’
स्टेशन प्रबंधक ए. के. शर्मा यांच्यासह मान्यवरांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नांद्रा (ता. पाचोरा), ता. २३ : भारतीय रेल्वेच्या स्पेशल कॅम्पेन अंतर्गत माहेजी (ता. पाचोरा) रेल्वे स्थानकावर ‘रेल जनसंवाद’ अभियान राबविण्यात आले. स्टेशन प्रबंधक ए. के. शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या या अभियानात रेल्वे प्रवासी, युवक आणि नागरिकांशी संवाद साधून रेल्वे सेवांबाबत जनजागृती करण्यात आली.
‘रेल की आवाज, युवा की सोच, रेल का समाधान’ या संकल्पनेतून आयोजित या अभियानाचा उद्देश रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमधील संवाद वाढविणे, प्रवाशांच्या समस्या व सूचना जाणून घेणे तसेच रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविणे हा आहे. या उपक्रमात सरपंच सुभाष तावडे, माजी सैनिक जगन्नाथ पाटील, डॉ. एस. पी. पाटील, डॉ. निवृत्ती मराठे, पत्रकार राजेंद्र पाटील, नगराज पाटील, संतोष कुमार, योगेश तिवारी यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. यानिमित्ताने रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे, प्रवाशांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि रेल्वेच्या विविध सुविधांबाबत जनजागृती करणे, यावर या अभियानातून भर देण्यात आला. रेल्वे स्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.