पान-२
३६-२
रेल्वेतर्फे केवळ ४५ पैशांत
१० लाखांचे विमा संरक्षण
सुविधा लागू; विमा आता आरक्षण केंद्रांवरही
सकाळ वृत्तसेवा
नाशिकरोड, ता.२७ ः रेल्वे प्रवाशांना अधिक आर्थिक सुरक्षा देण्यासाठी मध्य रेल्वेने ऐच्छिक प्रवास विमा सुविधा आता रेल्वे आरक्षण केंद्रांवरून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठीही उपलब्ध करून दिली आहे. मंगळवार (ता.२७) पासून या सुविधेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. अवघ्या ४५ पैशांच्या विमा हप्त्यात प्रवाशांना दहा लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळू शकणार आहे.
----------------
यापूर्वी ही सुविधा प्रामुख्याने आयआरसीटीसीच्या माध्यमातून ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध होती. आता प्रवासी आरक्षण प्रणालीच्या (पीआरएस) सर्व रेल्वे आरक्षण केंद्रांवरून आरक्षित तिकीट घेणाऱ्या प्रवाशांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
या विमा योजनेत रेल्वे अपघात किंवा अनुचित घटनेमुळे मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये आणि कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास कमाल साडेसात लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळेल. अपघातातील दुखापतींवरील रुग्णालयीन खर्चासाठी दोन लाख रुपयांपर्यंत, तर मृतदेहाच्या वाहतुकीसाठी १० हजार रुपयांची तरतूद आहे.
विमा घेणे ऐच्छिक असून, त्यासाठी प्रवाशांना मोबाइल क्रमांक देऊन लागू असलेला ४५ पैशांचा विमा हप्ता केवळ डिजिटल पेमेंटद्वारे भरावा लागेल. विमा स्वीकारलेल्या प्रवाशांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पॉलिसीचा तपशील पाठविण्यात येणार आहे. आरक्षण केंद्रांवरील कर्मचारी प्रवाशांना विमा निवडीबाबत मार्गदर्शन करतील. या योजनेचा लाभ घेताना आयआरसीटीसीच्या ई-तिकीट प्रवाशांसाठी लागू असलेल्या विद्यमान अटी व शर्ती लागू राहतील. रेल्वे प्रवासादरम्यान अनपेक्षित घटना घडल्यास आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.