पान-१
-------------
३०-२
रेल्वे मालवाहतूक वाढीसाठी
१४ ला उद्योग संवाद मेळावा
--------------
उद्योजकांना अडचणी मांडण्याची संधी
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिकरोड, ता.१० : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे रेल्वे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स उद्योग संवाद मेळावा बुधवारी (ता.१४) सकाळी दहाला नाशिकरोड येथील इरीन सभागृहात होणार आहे. भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे.
नाशिक आणि परिसरातील औद्योगिक आस्थापना, उत्पादक, व्यापारी, कृषी क्षेत्रातील संस्था, मालवाहतूक ग्राहक आणि लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार यांच्यात रेल्वे मालवाहतुकीच्या विकासाबाबत थेट संवाद साधणे, हा मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. उद्योगांच्या मालवाहतुकीच्या गरजा जाणून घेऊन रेल्वेमार्गे मालाची वाहतूक अधिक सुलभ, किफायतशीर आणि कार्यक्षम करण्याच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा होणार आहे.
नवीन मालप्रकारांची रेल्वेमार्गे वाहतूक, संभाव्य मालवाहतूक मार्गांचा शोध, लॉजिस्टिक्स संपर्कव्यवस्था मजबूत करणे तसेच रेल्वेच्या मालवाहतूक सुविधा, सेवा आणि धोरणांची माहिती यावर मेळाव्यात विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय, मालवाहतुकीदरम्यान येणाऱ्या अडचणी मांडण्याची आणि त्यावर उपाययोजना सुचविण्याची संधी उद्योग प्रतिनिधींना मिळणार आहे.
औद्योगिक संघटना, व्यापारी, कृषी व्यावसायिक, उत्पादक आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या सूचना व अपेक्षा मांडाव्यात, असे आवाहन केले आहे. विश्वासार्ह, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक मालवाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.