नाशिक: दागिन्याच्या रूपात भावाच्या मनगटावर कायम राखी असावी म्हणून बहिणी आपल्या लाडक्या भाऊरायासाठी सोन्या-चांदीचया राख्या खरेदी करतात. यंदाच्या राखी पौर्णिमेला सोन्या-चांदीच्या राख्यांमध्ये खास पेंडलची डिझाइन करण्यात आली आहे. जेणेकरून राखीचा धागा खराब झाल्यानंतर ते पेंडल म्हणून भावाला गळ्यातही परिधान करता येईल, या दृष्टिकोनातून राखींची घडणावळ करण्यात आली आहे. या राखींमध्ये बालाजी, गणपती, त्रिशूल, बासरी, एव्हील आय, ओम यांसारखे अनेक डिझाइन उपलब्ध असून, ग्राहकांच्या मागणीनुसार सराफ व्यावसायिक राखी बनवून देत आहेत.