रामझुला प्रकल्पाच्या खर्चात
पुन्हा वाढ होण्याची चिन्हे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : महत्त्वाकांक्षी रामझुला प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा एकदा वाढ होण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती उभारणे, रॅम्पचे काम आणि आकर्षक प्रकाशयोजना करण्यासाठी विद्यमान कंत्राटदाराकडूनच अतिरिक्त कामे करून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मूळ निविदेत २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कामे त्याच कंत्राटदाराकडून करून घेण्याची तरतूद असल्याचा आधार घेत प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया न राबवता थेट हाच मार्ग अवलंबला आहे.
हा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या महासभेच्या पटलावर जादा विषय म्हणून मांडण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. प्रशासकीय मंजुरी मिळताच रामझुल्याचे रॅम्प, लायटिंग आणि मूर्ती उभारणीच्या कामाला वेग येणार आहे, मात्र त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर तब्बल ६ कोटी ५६ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या आराखड्यातही महत्त्वाचा बदल केला आहे. सुरुवातीला रामझुला हा धनुष्याच्या आकारात बांधण्याचे नियोजित होते. या धनुष्यावर प्रभू श्रीरामांची प्रतिकृती उभारण्यासाठी विशेष स्टेजिंग उभारावे लागणार आहे. मात्र, भविष्यात निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागल्यास या धनुष्याच्या आकारामुळे आक्षेप किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाला वाटत आहे. हा संभाव्य वाद टाळण्यासाठीच धनुष्याचा आकार वगळून केवळ प्रभू श्रीरामांची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय प्रस्तावात घेण्यात आला आहे.