पान तीन
-----------------
रामलीला महोत्सवाला अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार
देवयानी फरांदे : हजारो भाविकांच्या उपस्थितीत गांधीनगरला रावणदहन
सकाळ वृत्तसेवा
डीजीपीनगर, ता. २० : ‘असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय’ अधोरेखित करणाऱ्या व ७१ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या, प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचा जागर करणाऱ्या रामलीला महोत्सवाची गांधीनगर येथे हजारो भाविकांच्या साक्षीने ६५ फुटी रावण दहनाने सांगता झाली. नाशिककरांच्या उज्ज्वल इतिहासाची आठवण असलेल्या आणि समाजाला योग्य दिशेने प्रबोधन करणाऱ्या या रामलीला महोत्सवाला शासन स्तरावरून अनुदान मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रसंगी दिले.
हजारो भाविकांच्या उपस्थितीत गांधीनगर येथे ६५ फुटी रावणदहनाने नवरात्रोत्सवाची सांगता झाली. यावेळी त्या बोलत होत्या. सोहळ्यास रामलीला समितीचे मुख्य मार्गदर्शक, नगरसेवक राहुल दिवे, पोलिस उपायुक्त किशोर काळे, नगरसेविका आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे, नगरसेवक प्रशांत दिवे, रवी देशपांडे, अभियंता शिवम पाटील, संजय अग्रवाल, भूपेश शर्मा, परमपूज्य वीणा दीदी, प्रवीण नवले, अनिल जोंधळे, महानिदेशक यतींद्र कुमार, मुकुंद काळे, पोलीस अधिकारी शिंदे मॅडम, नागेश ब्राह्मणे, ताराचंद गुप्ता, मंजू शर्मा, पायल शर्मा, प्रदीप भुजबळ, रफिक तडवी, महासचिव कपिल देव शर्मा, पप्पू कोहली, रामलीला वरिष्ठ कलाकार दिलबागराय आदी मान्यवर उपस्थित होते.
-------
घनघोर युद्ध अन् रावणदहन
यंदाच्या महोत्सवात गणेश वंदना, रावण-विभीषण आणि कुंभकर्ण वरदान, रावणाचे अत्याचार, रावणसभा, रामजन्म व सीताजन्म आदी प्रसंग कलाकारांनी वठवले. यामध्ये सचिन दलाल यांनी श्रीराम, पायल शर्मा यांनी सीता, तर ज्ञानेश्वर कुंडारिया यांनी रावणाची प्रभावी भूमिका साकारली. प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातील घनघोर युद्धाच्या थरारक सादरीकरणानंतर ६५ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
----
७१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा
१९५५-५६ मध्ये सुरू झालेली ही रामलीलेची परंपरा स्थानिक कलाकारांनी आजही मोठ्या निष्ठेने जपली आहे. रामायणातील श्रीराम जन्म, वनवास, सीताहरण आणि रावणाशी युद्ध अशा विविध प्रसंगांचे अत्यंत जिवंत नाट्यमय सादरीकरण येथे केले जाते.