फोटो : H31435
--
‘रणभूमीच्या पार्श्वभूमीवर’ चे सुरेख सादरीकरण
पाली भाषा दिनाच्या औचित्याने नाटकाचा प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : धम्मपाल जयंती उत्सव तथा पाली भाषा गौरव दिनाच्या औचित्याने संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे ‘रणभूमीच्या पार्श्वभूमीवर’ पाली मराठी भाषेतील नाटकाचा प्रयोग रविवारी (ता. ४) झाला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या नाटकातून धम्मचक्र परिवर्तनाच्या प्रवासाचे सुरेख सादरीकरण रंगमंचावर करण्यात आले.
एका चक्रवर्ती सम्राटाने तलवारीच्या बळावर मिळविलेल्या साम्राज्याचा प्रवास रक्तरंजित युद्धाकडून शांतीच्या मार्गावर कसा झाला. दोन्ही राज्यांच्या सैनिकांचा झालेला नरसंहार आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला झालेल्या यातना, दुःख त्याचे अंतर्मुख करणाऱ्या प्रसंग प्रेक्षकांना भावुक करून गेले. कलिंगाच्या नरसंहारानंतर ज्या सम्राटाने कधीही तलवार हातात न घेता जगभर शांतीचा प्रचार प्रसार कसा केला, रणभूमीवर बौद्ध भिक्खूने सम्राट अशोकाला युद्ध नको.. बुद्ध हवे.. हा संदेश कसा दिला याची मांडणी नाट्यप्रयोगातून करण्यात आली. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहित पगारे यांनी केले. नेपथ्य समाधान मुर्तडक, प्रतीक गांगुर्डे, प्रकाशयोजना रवी रहाणे,संगीत भरत कुलकर्णी, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा मिलिंद साळवे यांनी केली.तर रंगमंच साहाय्य जबाबदारी अमोल पाठारे यांनी सांभाळली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, प्रा डॉ सुनील कुटे, नामदेव लोणारे, ॲडण् अपर्णा पाटील, सुनील त्रिभुवन, प्रा.अस्मिता राजोळे उपस्थित होते. प्रा.अस्मिता राजोळे यांनी प्रस्तावनेत संस्थेचे उद्दिष्टे स्पष्ट केले. डॉ. शीतल देवकर यांनी सूत्रसंचालन केले. देवीदास वाटाणे यांनी आभार मानले.
------------