
नाशिक : रणजीपटू सत्यजित बच्छाव याची २०२२-२३ च्या हंगामाच्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभाग संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातर्फे नव्या क्रिकेट हंगामाची सुरवात दुलिप ट्रॉफीने होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभाग चमूत नाशिकचा डावखुरा फिरकीपटू व भरवशाचा तळातील फलंदाज सत्यजित बच्छावची निवड झाली आहे. (Ranji player Satyajit Bachhav selected in West Division team for Dulip Trophy nashik latest marathi news)
दुलिप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा ८ ते २५ सप्टेंबरदरम्यान चेन्नई (तमिळनाडू) येथे होईल. मागील तीन, चार रणजी हंगामात केलेल्या उत्कृष्ट, सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सत्यजितची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेसोबतच सय्यद मुश्ताक अली टी-२० व एकदिवसीय विजय हजारे स्पर्धेतदेखील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहे.
प्रथम श्रेणी सामन्यात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना सत्यजितने आतापर्यंत २६ सामन्यांत ९९ बळी घेतले आहेत. यात एका सामन्यात दहा बळी घेण्याचा विक्रम एकदा, तसेच डावात पाच बळी चारदा, तर सहा वेळा चार गडी बाद करण्याची जोरदार कामगिरी सत्यजितने केली आहे.
त्याबरोबरच खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीनेदेखील संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी आपला वाटा उचलला आहे. आतापर्यंत ६७ या सर्वोच्च धावसंख्येसह चार अर्धशतके त्याने झळकावली आहेत.
मागील रणजी हंगामात रोहतक, हरियाना येथे झालेल्या एलिट गटातील ग्रुप जिच्या सामन्यात सत्यजित बच्छावने आसाम विरुद्ध महाराष्ट्र संघातर्फे जोरदार अष्टपैलू कामगिरी करताना सामन्यात एकूण ११ बळी व ५२ धावा, असे महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे महाराष्ट्र संघाने एक डाव व सात धावांनी सामना जिंकला.
विदर्भाविरुद्धच्या सामन्यात चिवट फलंदाजीच्या जोरावर १६२ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या. त्यामुळे महाराष्ट्र संघाला सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळाले. उत्तर प्रदेश विरुद्धदेखील सामन्यात एकूण ८ बळी घेत लक्षणीय कामगिरी केली.
सत्यजितची याआधी आयपीएल २०२२ हंगामात चेन्नई सुपर किंग्सतर्फे महेंद्र सिंग धोनीच्या वलयांकित संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती. चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणून त्याला संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते.
आयपीएल २०२२ चा पूर्ण हंगाम सत्यजित चेन्नई सुपर किंग्स संघाबरोबर होता. २०२२ आयपीएल लिलावात, २० लाख इतकी कमीत कमी बोली किंमत मिळणाऱ्या खेळाडूंच्या, आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात सत्यजित समाविष्ट होता. दरम्यान, सत्यजितच्या निवडीबद्दल जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.