नाशिक : भाजपा नगरसेविकेच्या पतीला मागितली खंडणी; ब्लॅकमेलरला पोलिसांची चपराक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

blackmail

भाजपा नगरसेविकेच्या पतीला मागितली खंडणी; ब्लॅकमेलरला पोलिसांची चपराक

म्हसरूळ (नाशिक) : शहरातील विविध पोलिस ठाण्याकडे वारंवार खोटे अर्ज करून पंचवटीतील एका भाजपा नगरसेविकेच्या पतीकडे तब्बल १५ लाखांची खंडणी मागणे, तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्याला पंचवटी पोलिसांनी चांगलीच चपराक दिली असून, त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पंचवटीतील भाजपाच्या माजी नगरसेविका प्रियंका माने यांचे पती धनंजय उर्फ पप्पू माने यांना धमकावत संशयित अनिकेत निकाळे (रा.महालक्ष्मी नगर, हिरावाडी रोड पंचवटी) याने पंचवटी पोलिस ठाण्यासह अन्य ठिकाणी खोटे अर्जफाटे केले होते. यात पप्पू माने यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही आरोप करण्यात आले होते. त्यामुळे माने यांनी पोलिस ठाण्यात जाऊन यासंदर्भात जबाबही लिहून देत आरोपांचे खंडन केले होते. मात्र संशयिताने माने यांच्या मित्राची भेट घेत त्यांना सांगितले की, 'तुझा मित्र पप्पू माने यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून मी पोलिसांत तक्रार केली असून, लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे सांग, जर माने याने मला पंधरा लाख रुपये दिले तर तक्रार मागे घेतो, त्यात तडजोड करीत सात ते आठ लाख रोख व माझा एक व्यक्ती महापालिकेत कामाला लावावा, अशी मागणी केली.

हेही वाचा: नाशिक : मुस्लिम बांधवांकडून सलीम शेख यांचा निषेध

यामुळे मंगळवार ( ता.०५ ) रोजी मित्राच्या मध्यस्थीने माने यांनी संशयिताची भेट घेत मला विनाकारण का त्रास देतोय, अशी विचारणा केली. त्यावेळीदेखील संशयिताने माने यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. यानंतरही संशयिताने माने यांच्या मित्राला वारंवार फोन करून रकमेची मागणी केली. अखेर संशयिताने माने यांना धमकावल्याने माने यांनी त्यास नवीन आडगाव नाका येथील अक्सिस बँकेच्या शाखेतून पन्नास हजार रुपये काढून दिले. मात्र माने यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत ही बाब व घडलेला प्रकार पंचवटी पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस करणार सखोल चौकशी

निवडणुकांचा हंगाम सुरू झाला की असे गैरप्रकार घडण्याची शक्यता असते. राजकीय वर्चस्वातूनही असे प्रकार घडतात. त्यामुळे नगरसेविकेच्या पतीकडे खंडणी मागत त्यांना बदनाम करण्याची धमकी देणे, ही बाब गंभीर असल्याचे सांगत पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी काही पुरावेही हस्तगत केले आहेत. तसेच, या प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासनाला विनाकारण कामाला लावणारा संशयित अनिकेत निकाळे हा नेमके कुणाच्या सांगण्यावरून अर्जफाटे करत होता, यात काही राजकीय व्यक्तींचा हात आहे का, या बाबीही सूक्ष्मपणे तपासल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

कोरोनाकाळात माने दांपत्याने वाखाण्याजोगे काम केले आहे. यामुळे प्रभागात माने दांपत्याचा नावलौकिक वाढला होता. यामुळे राजकीय विरोधकांकडूनही अनिकेत निकाळेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन असे कृत्य केले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. खोटे अर्जफाटे करून माने यांचे राजकीय करियर संपविण्याचा घाट संशयिताने घातला होता, असादेखील संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिस प्रशासनाची सतर्कता आणि त्यांच्या समयसुचकतेमुळे खोटा गुन्हा दाखल करण्याचा संशयिताचा डाव फसला असून, एका सच्चा कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: फळझाडांची अवैध कत्तल पकडली; मुद्देमालासह 3 जण ताब्यात

''गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही पती-पत्नीने प्रभागात प्रामाणिकपणे केलेल्या कामांमुळे जनतेच्या मनात आमची जागा निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय विरोधकांनी असे कितीही कुभांड रचले तरी काहीही फायदा होणार नाही. संबंधित व्यक्तीच्या मागे काही राजकीय विरोधक असून, ते इतक्या खालच्या थराला जातील, अशी अपेक्षा नव्हती. येत्या निवडणुकीत जनता जनार्दन त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. पोलीस प्रशासन आणि न्याय देवतेवर आमचा विश्वास असून, सत्याचा नेहमीच विजय होतो, हे आज पंचवटी पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या सतर्कतेमुळे सिद्ध झाले आहे.'' - धनंजय (पप्पू) माने, तक्रारदार

''सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. गुन्हा दाखल करताना सर्व पुरावे तपासून पाहिले. वेळ पडल्यास संशयिताचे 'सीडीआर' तपासणी करून या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. याबाबत जसे जसे पुरावे मिळत जातील, त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.'' - डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे.

Web Title: Ransom Demanded From Bjp Corporators Husband In Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpNashikransomBlackmail